ज्योती देवरे यांनी घेतली अण्णा हजारेंची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:23 AM2021-08-23T04:23:35+5:302021-08-23T04:23:35+5:30
पारनेर (अहमदनगर) : ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने वादग्रस्त ठरलेल्या पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांनी ज्येष्ठ समाजेसवक अण्णा हजारे यांची ...
पारनेर (अहमदनगर) : ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने वादग्रस्त ठरलेल्या पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांनी ज्येष्ठ समाजेसवक अण्णा हजारे यांची रविवारी सकाळी भेट घेतली. दरम्यान, पारनेरच्या तहसील कार्यालयातील कर्मचारी, वरिष्ठ अधिकारी यांनी ज्योती देवरे यांच्या बदलीसाठी कामबंद आंदोलनाचा इशारा दिला आहे.
तहसीलदार ज्योती देवरे यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर आमदार निलेश लंके यांनी शनिवारी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेतली. लंके यांनी देवरे यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपाबाबतची माहिती हजारे यांना दिली. लंके यांच्यापाठोपाठ रविवारी सकाळी देवरे यांनीही हजारे यांची राळेगणसिद्धी येथे भेट घेतली.
यावेळी देवरे यांनी हजारे यांना राखी बांधण्याची इच्छा व्यक्त केली. हजारे म्हणाले, या वादात पडण्याची आपणाला इच्छा नाही. तुम्ही प्रशासकीय अधिकारी आहात. तुम्ही कणखर असायला हवे. आत्महत्येचा विचार मनातून काढून टाका. माणसाने प्रत्येक बाबीला सामोर जायला हवे. अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचारविरहित काम करायला हवे.
तुकाराम मुंढेंसारखे खंबीरपणे काम केले पाहिजे, अशी अपेक्षा हजारेंनी व्यक्त केली, असे हजारे यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आले.
दरम्यान, ज्योती देवरे यांच्या मनमानी कारभाराला कंटाळलो असल्याचे सांगत पारनेर तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी बुधवार (दि. २५) पासून बेमुदत कामबंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. देवरे यांच्यासोबत काम करणे अशक्य असल्याने त्यांची तातडीने बदली करण्याची मागणी कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठविलेल्या निवेदनात केली आहे.
-----
२२ ज्योती देवरे
पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांनी रविवारी सकाळी राळेगणसिद्धी येथे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेऊन चर्चा केली.