को-२३८ उसाचे वाण महाराष्ट्रात नापास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2018 04:16 PM2018-07-05T16:16:07+5:302018-07-05T16:16:16+5:30
गाजावाजा करून सोशल मीडियावर फोकसमध्ये प्रसिध्दीच्या झोतात आलेल्या ‘को-२३८’ या ऊसाच्या वाणाचा फज्जा उडाला आहे.
भाऊसाहेब येवले
राहुरी : गाजावाजा करून सोशल मीडियावर फोकसमध्ये प्रसिध्दीच्या झोतात आलेल्या ‘को-२३८’ या ऊसाच्या वाणाचा फज्जा उडाला आहे. एकरी दोनशे टन उत्पादन, वीस उतारा, लवकर उंच वाढणारी म्हणून राज्याच्या विविध भागात घेण्यात आलेल्या चाचण्यात वाण टिकाव धरू शकला नाही. राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठातील ऊस विशेषज्ज्ञ डॉ़आनंद सोळंकी यांनीही या वाणाला लाल कंदील दाखविला आहे.
उत्तर प्रदेश, तामीळनाडू, मध्यप्रदेश, हरियाणा या राज्यात को-२३८ या वाणाची शिफारस करण्यात आली होती. उंच वाढलेले उसाचे फोटो व्हॉटस् अॅपवर व्हायरल झाल्यानंतर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर बेण्याची मागणी केली. मात्र अल्प शेतक-यांनाच बेणे उपलब्ध झाले. भेंडा, समर्थ, संजीवनी, घोडगंगा आदी ठिकाणी साखर कारखान्यांच्या माध्यमातून को-२३८ वाणाच्या गेल्यावर्षी चाचण्या घेण्यात आल्या. महाराष्ट्र व उत्तर भारतातील हवामान यामध्ये फरक असल्याने महाराष्ट्रातील शेतक-यांनी लागवड करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
राहुरी येथील महात्मा फु ले कृषी विद्यापीठातील ऊस विशेषज्ज्ञ डॉ़आनंद सोळंकी यांनी ‘लोकमत’शी बोलतांना सांगितले, को-३३८ उसाच्या वाणासंदर्भात शेतक-यांशी विद्यापीठाने संपर्क साधला. उत्तर भारतात थंड हवामान व जमीन व महाराष्ट्रातील उष्ण हवामान व जमिनीतील फरक यामुळे राज्यातील शेतक-यांनी लागवड करू नये, असे सूचविण्यात आले आहे. या वाणाला लवकर तुरे येतात. उतारा मिळत नाही. कांड्यांची संख्या १८ ते २० राहते. त्यामुळे शेतक-यांनी राज्यात येणा-या व मान्यता असलेल्या उसाची लागवड करावी, असे सुचविण्यात आले आहे.
ऊस प्रजनन केंद्र कोईमतूर (तामीळनाडू) यांच्या माध्यमातून व व्हीएसआय पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञानेश्वर साखर कारखान्याने को-२३८ या वाणाची मल्टी लोकेशन चाचणी नुकतीच पूर्ण केली असल्याची माहिती मंगेश नवले यांनी दिली. चाचणीमध्ये आपले हवामान व जमिनीवर या वाणाची लागवड करणे शक्य नसल्याचे नमूद करण्यात आले आहे.
चाचणीतून बाहेर आलेले गुणधर्म
महाराष्ट्रात ८ ते १० महिन्यात फुलोरा येतो़ अकरा महिन्यात पूर्ण प्लॉटला फुलोरा येतो.राज्यातील जमिनीवर उसाची जाडी मिळत नाही. त्यामुळे उत्पादनात घट होते. तीव्र उन्हामुळे खोड किडीचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव होतो. फुलो-यामुळे ऊस २० कांड्याच्या पुढे वाढ होत नाही.उतारा साडेअकरा आला.फुटवे व उगवण क्षमतेत फे ल झाली.