अडीच कोटी खर्चाच्या पुणतांबा-शिंगवे रोडला आठ महिन्यातच खड्डे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2018 05:40 PM2018-11-20T17:40:45+5:302018-11-20T17:41:25+5:30
मार्च २०१८ महिन्यात जवळपास २.५० कोटी रुपये खर्च कोपरगाव-श्रीरामपूर या राज्यमार्ग ३६ वर येणाऱ्या पुणतांबा फाटा ते शिंगवे या अंदाजे आठ किलोमीटर रस्त्याचे सुधारणा व दुरुस्तीचे काम करण्यात आले होते. परंतु सध्यस्थितीत हा रस्ता ठिकठिकाणी उखडला आहे.
कोपरगाव : मार्च २०१८ महिन्यात जवळपास २.५० कोटी रुपये खर्च कोपरगाव-श्रीरामपूर या राज्यमार्ग ३६ वर येणाऱ्या पुणतांबा फाटा ते शिंगवे या अंदाजे आठ किलोमीटर रस्त्याचे सुधारणा व दुरुस्तीचे काम करण्यात आले होते. परंतु सध्यस्थितीत हा रस्ता ठिकठिकाणी उखडला आहे. यासंदर्भात संबंधित विभागाकडे ग्रामस्थांनी तक्रारही केली. वर्तमानपत्रात वृतही प्रसिद्ध झाले. अद्यापपर्यंत या रस्त्याची दुरुस्ती झाली नसल्याने या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी होत आहे.
या रस्त्याची कोपरगाव सार्वजनिक बांधकाम उपविभाग माधमातून देखभाल दुरुस्तीचे काम केले जाते. सदर रस्त्याचे मागील मार्च महिन्याच्या शेवटी २.५० कोटी खर्च करुन डांबरीकरण करण्यात आले. परंतु सदर काम हे निकृष्ट दर्जाचे झाले. विशेष म्हणजे या रस्त्याचे काम सुरु असताना परिसरातील ग्रामस्थांनी याचे चित्रीकरण करून सोशल मीडियावरही टाकले होते. या रस्त्याच्या निवीदेमध्ये काम केल्यानंतर पुढील दोन वर्षाच्या देखभाल दुरुस्तीची तरतूद आहे. परंतु रस्त्याचे काम झाल्यापासूनच पडलेल्या खड्ड्यांची आठ महिने उलटूनही दुरुस्ती होत नसल्याने संबंधित ठेकेदार व बांधकाम विभागाच्या कार्यपद्धतीवर संशय व्यक्त केला जात आहे.
या रस्त्याच्या कामासंदर्भात ‘लोकमत’ने दूरध्वनीवरुन संपर्कसाधण्याचा प्रयत्न केला असता संबंधित अधिका-यांनी प्रतिसाद दिला नाही.
या खड्ड्यांचे काय?
राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी एका कार्यक्रमादरम्यान राज्यातील रस्त्यासंदर्भात सांगितले होते की, येत्या काळात राज्यातील सर्वच रस्त्याची कामे केली जाणार आहेत. त्यामुळे सेल्फी काढणा-यांना खड्डेच सापडणार नाहीत. परंतु कोपरगाव तालुक्यात आठ महिन्यापूर्वीच आठ किलोमीटर डांबरीकरण झालेल्या या रस्त्याच्या खड्ड्यांचे काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.