काजवा महोत्सव : सांधन दरीची सफर पर्यटकांचे ठरले आकर्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2018 06:31 PM2018-06-06T18:31:44+5:302018-06-06T18:32:54+5:30

भंडारदरा परिसरात पाणलोटाच्या डोंगरदरीत रात्रीच्या काळोखात लक्ष लक्ष काजव्यांच्या प्रकाश महोत्सवास सुरुवात झाली. इंद्राच्या मय्यसभेस लाजवील अशी प्रकाश फुलांची आरास धरतीवर उतरली आहे.

Kajwa Festival: Travel to Bhadhan Valley Travel Attractions | काजवा महोत्सव : सांधन दरीची सफर पर्यटकांचे ठरले आकर्षण

काजवा महोत्सव : सांधन दरीची सफर पर्यटकांचे ठरले आकर्षण

अकोले : भंडारदरा परिसरात पाणलोटाच्या डोंगरदरीत रात्रीच्या काळोखात लक्ष लक्ष काजव्यांच्या प्रकाश महोत्सवास सुरुवात झाली. इंद्राच्या मय्यसभेस लाजवील अशी प्रकाश फुलांची आरास धरतीवर उतरली आहे. सोमवारी सायंकाळी भंडारदरा पाणलोटात तासभर झालेल्या दमदार पर्जन्यवृष्टीने हवेत गारवा निर्माण होतानाच काजव्यांच्या संख्येत लाक्षणिक वाढ झाली आहे. काजवा महोत्सवासाठी आलेले पर्यटक साम्रद येथील गुढरम्य ‘सांदन’ दरीची सफर करीत पर्यटनाचा आनंद द्विगुणीत करुन घेत आहेत.
दरवर्षी भंडारदरा परिसर लक्ष लक्ष काजव्यांच्या प्रकाश फुलांनी उजळून निघतो. पाणलोटच्या दरीकंदरात वाऱ्याची झुळुक वाहिली की, आंबा,हिरडा, बेहडा, सादडा,उंबर,जांभुळ अशा अनेक झाडांवरती काजव्यांचा लखलखाट दिसतो. काजव्यांची ही मयसभा पाहण्यासाठी पर्यटकांची पावले भंडारदºयाकडे वळली आहेत. दिवसभर सांदन दरीची सफर करायची आणि रात्री काजवे पहायचे असा पर्यटक आनंद द्विगुणीत करताना दिसतात. आशिया खंडातील दुसºया क्रमांकाची व्हॅली पाहण्यासाठी पर्यटकांची झुंबड दिसते. रतनगड आणि घोड्याचं पाऊल ‘टेबल लॅड’ या दोन डोंगरांना जोडणारी साम्रद, चिराचीवाडी येथील गूढरम्य सांदन दरी आहे. केवळ पुरुषभर रुंदीची, दीड दोन हजार फूट उंचीची कातीव कातळकडा असलेली आणि अडीच ते तीन किलोमिटर लांबीची ही दरी पाहण्यासाठी पर्यटकांनी काजवा महोत्सवाची पर्वणी साधली आहे. पायात दम असणारे पर्यटक सांदन दरीचं टोक गाठतात आणि कोकणकड्याचा अनुभव घेतात. पावसाळ्यात या दरीत जाता येत नाही. दरीचा टोकाकडील भाग धोकादायक बनला असून येथे कडा कोसळण्याची भीती आहे.
सांदन दरीत दोरीने रॅपलींग करण्याचा आनंद पर्यटक घेत होते. सोमवारच्या पावसाने सांदन दरीत काही ठिकाणी पाणी साठले असून कमरे इतक्या पाण्यातून पुढे जात काहींनी दरीचे टोक गाठले. डॉ.वर्षा निफाडे, डॉ.प्रतिभा दिघे, डॉ.श्रीकांत घोरपडे,अभिजित निर्मळ, मानसी आवारी,सानिका आवारी,शार्दुल आवारी यांनी कपारीच्या टोकावरुन दोरीने खाली दरीत उतरण्याचा अनुभव घेतला.
पर्यटकांना घ्यावी लागते विशेष काळजी
सांदन दरी व काजवे पाहताना विशेष काळजी घ्यावी लागते. पायात बूट असावेतच तसेच डोक्यावरील कड्याकडे सतत लक्ष असावे लागते. भर पावसाळ्यात कधीच दरीत उतरु नये. पाण्याचा मोठा लोट कधी येईल ते सांगता येत नाही. दरीत सायंकाळी लवकरच अंधारुन येते. अंधारामुळे खोलदरीचा अंदाज घेता येत नाही. या काळात विषारी निशाचर सरपटणाºया प्राण्यांचा वावर अधिक असतो. संभाव्य धोका टाळण्यासाठी पायात बूट आणि हातात विजेरी आवश्यक असतेच.

दरवर्षी कुटुंबासह काजवे पहावयास येतो. यंदा सांदन दरी पाहण्याचा आनंद घेतला. दरी गूढरम्य आणि पर्यटकांसाठी चैतन्यदायी आहे. उडदावणे, पांजरे भागात काजवे मात्र फार दिसले. रॅपलींगचा आनंद घेतला. येथील आदिवासी पर्यटकांना खूप मदत करतात. -डॉ.संतोष निफाडे, नाशिक.

सोमवारी झालेल्या पावसाने काजव्यांच्या संख्येत चांगली वाढ झाली आहे. भंडारदरा धरण पाणलोट क्षेत्रात काजवे चांगले दिसतात. शनिवार, रविवार पर्यटकांची चांगली गर्दी होती. जवळपास अडीच तीन हजार टेंट लावण्यात आले होते. यातून स्थानिक आदिवासींना चांगला रोजगार उपलब्ध झाला आहे. -अमित भांगरे, स्थानिक रहिवासी.

यंदा काजवा महोत्सवात पर्यटकांच्या संख्येत वाढ झाली आहे. अधिकारी वर्गालाही कालव्यांनी भूरळ घातली असून जिल्हा पोलीस अधिक्षक रंजनकुमार शर्मा, वनसंरक्षक एन.आर.प्रविण यांनी परिसराला भेट देवून काजवे पाहण्याचा आनंद घेतला. पर्यटकांनी काजवे पाहण्याच आनंद घेताना संयम पाळावा, निसर्गास हानी पोहचणार नाही याची काळजी घ्यावी. -डी.डी.पडवळ, वनपरिक्षेत्रपाल, वन्यजीव भंडारदरा.

 

Web Title: Kajwa Festival: Travel to Bhadhan Valley Travel Attractions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.