काजवा महोत्सवाला लाॅक अन् पर्यटनाचे उत्पन्न डाऊन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:19 AM2021-05-22T04:19:07+5:302021-05-22T04:19:07+5:30
अकोले : भंडारदरा धरण पाणलोट परिसरात काजव्यांच्या मयसभेचा लखलखाट असतो. पण यंदाही कोरोनाच्या ग्रहणामुळे काजवा महोत्सव लाॅक आणि पर्यटन ...
अकोले : भंडारदरा धरण पाणलोट परिसरात काजव्यांच्या मयसभेचा लखलखाट असतो. पण यंदाही कोरोनाच्या ग्रहणामुळे काजवा महोत्सव लाॅक आणि पर्यटन व्यवसायातून मिळणारे आर्थिक उत्पन्न डाऊन झाले आहे.
ग्रीष्म ऋतू संपतो न संपतो तोच वर्षाराणीच्या स्वागतासाठी काजव्यांच्या रुपात प्रकाशदूत धरतीवर अवतरतात. गगनातील तारांगणच जणू भुईवर उतरते आणि रात्रच लाखो चांदण्याची झाली आहे, असा आभास काजव्यांची मायावी दुनिया निर्माण करते. काजव्यांच्या अस्तित्त्वाने रात्रीच्या प्रकाशाचा अदभूत खेळ पाहात बसलो तरी मन काही तृप्त होत नाही.
काजवे पाहणे निसर्गप्रेमींच्या दृष्टीने एक अविस्मरणीय अनुभव असतो. परंतु सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे थैमान सुरू आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे यावर्षीचा भंडारदरा - कळसुबाई - हरिश्चंद्रगड या परिसरातील काजवा महोत्सव रद्द करण्याचा निर्णय येथील ग्रामस्थ आणि वन विभागाने घेतला आहे. या परिसरात कोणत्याही पर्यटकांनी निर्बंध मोडून येऊ नये, असे आवाहन वन समित्यांनी व शेंडीचे सरपंच दिलीप भांगरे, रतनवाडीचे सरपंच संपत झडे यांनी केले आहे.
दरवर्षी मे महिन्याच्या उत्तरार्धात भंडारदरा अभयारण्य परिसरात असंख्य झाडे ही काजव्यांच्या लखलखटाने बहरून जातात. ही काजव्यांची आरास अर्थात लयबद्धपणे सुरू असलेले प्रकाशनृत्य पाहण्यास निसर्गप्रेमी पर्यटकांसाठी पर्वणीच असते. राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो पर्यटक हा निसर्गाचा अनुभव घेण्याकरिता या परिसरात भेट देत असतात. परंतु गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षीही कोरोनाच्या सावटामुळे हा निसर्गाविष्कार पर्यटकांना अनुभवता येणार नाही.
परिणामी येथील पर्यटनावर अवलंबून असणारा रोजगार मात्र बंद झाला आहे. शेतीवर अवलंबून असणाऱ्या येथील आदिवासींना पर्यटनाद्वारे निवास - न्याहारीची सोय, वाटाड्या (गाईड), जंगल भ्रमंती यांच्या माध्यमातून रोजगाराची संधी उपलब्ध होत असते. सलग दोन वर्षे पर्यटन बंद असल्याने येथील स्थानिकांची आर्थिक गणिते कोलमडून पडली आहेत. बेरोजगारीसोबतच उपासमारीची वेळही आली आहे. शासनाने या परिसरात विशेष लक्ष देऊन आवश्यक ती मदत द्यायला हवी. तसेच समाजातील दानशूर व्यक्तींच्या पुढाकाराने जीवनावश्यक वस्तूंची मदत या परिसराला व्हावी. सरकारनेदेखील येथे पर्यटन व्यवसायावर अवलंबून असणाऱ्यांना मदतीचा हात द्यावा, अशी अपेक्षा भंडारदरा टुरिझमचे रवी ठोंबाडे यांनी व्यक्त केली आहे.
................
यंदाही काजवा महोत्सव रद्द ठेवण्याचा स्तुत्य निर्णय परिसरातील लोकांनी घेतला आहे. स्पिल-वे व आनंदवन या दोन्ही ठिकाणी नाकाबंदी सुरू आहे. वन्यजीवचे पथक रिंग-रोड परिसरात रात्रंदिवस गस्त घालत आहे. स्थानिक आदिवासी रानातून हिरडा व करवंद गोळा करत असून, सध्या हेच एकमेव त्यांचे उपन्नाचे साधन आहे.
- अमोल आडे, वन परिक्षेत्रपाल, वन्यजीव विभाग.