काकासाहेब शिंदे यांचा दशक्रिया विधी : नगर-औरंगाबाद महामार्गावरील वाहतूक वळविली, पोलीस बंदोबस्त तैनात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2018 05:43 PM2018-07-31T17:43:43+5:302018-07-31T17:43:52+5:30
मराठा आरक्षण आंदोलनामध्ये जलसमाधी घेतलेल्या काकासाहेब शिंदे यांचा बुधवार (दि.१आॅगस्ट) रोजी कायगाव टोका येथे दशक्रिया विधी होणार आहे.
नेवासा : मराठा आरक्षण आंदोलनामध्ये जलसमाधी घेतलेल्या काकासाहेब शिंदे यांचा बुधवार (दि.१आॅगस्ट) रोजी कायगाव टोका येथे दशक्रिया विधी होणार आहे. या दशक्रिया विधीसाठी मोठ्या संख्येने मराठा बांधव सहभागी होणार असल्याची शक्यता असल्याने होणारी वाहतूक कोंडी आणि कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने खबरदारी म्हणून औरंगाबाद - पुणे या महामार्गावरील वाहतूक पैठण, शेवगांव मार्गे वळवण्याचा निर्णय औरंगाबाद ग्रामीणचे पोलिस अधीक्षकांनी घेतला आहे.
कायगाव टोका येथील आंदोलनामध्ये सहभागी असलेल्या ७६ आंदोलकांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले होते. त्यापैकी ३१ जणांवर गंभीर गुन्हे दाखल केले. आंदोलन प्रकरणातील राज्यातील सर्व गुन्हे मागे घेण्यात यावेत अन्यथा शहीद काकासाहेब शिंदे यांच्या कायगाव येथील गोदावरी पुलावरील जलसमाधीस्थळी जलसमाधी घेण्याचा इशारा आंदोलकानी सोशल मिडियाद्वारे इशारा दिला आहे. त्यामुळे कायगांव येथील गोदावरी पुलावर सोमवारी रात्रीपासूनच औरंगाबाद तसेच नेवासा पोलिसांकडून कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे
१ आॅगस्ट रोजी अहमदनगर येथून औरंगाबादकडे येणा-या वाहन धारकांनी पांढरीपूल- शेवगाव-पैठण -बिडकीन- औरंगाबाद मार्गाने वाहतूक वळविण्यात आली आहे. सर्व वाहन धारकांनी दिलेल्या पर्यायी मार्गाचा वापर करावा व वाहतूक कोंडी टाळावी. कोणालाही त्रास होऊ नये यासाठी पर्यायी मार्गाचा अवलंब करून पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन औरंगाबाद ग्रामीण पोलीस अधिक्षकांनी केले आहे.
गोदावरी नदी वरील जुन्या व नवीन पुलावर दक्षिणेकडे औरंगाबाद पोलिसांनी तर उत्तरेकडे नेवासा पोलिसांनी सोमवारी रात्री पासूनच मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. यामध्ये नेवासा हद्दीत तीन अधिकारी व ५० पोलीस कर्मचारी तर नेवासा फाटा येथे एक अधिकारी व १० कर्मचारी तैनात करण्यात आले असल्याची माहिती नेवासा पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक शरद गोर्डे यांनी दिली. नेवासा बस आगाराच्या औरंगाबादकडे जाणा-या सर्व बस १ आॅगस्ट रोजी बंद ठेवणार असल्याचे स्थानक प्रमुख रमेश सोनवणे यांनी सांगितले.