कळसूबाई शिखर फुलोत्सवाने बहरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2019 12:06 PM2019-10-07T12:06:21+5:302019-10-07T12:08:32+5:30
नवरात्र उत्सवासाठी येणा-या भाविक आणि पर्यटकांबरोबर सुरु झालेल्या फुलोत्सवाने कळसूबाई शिखर बहरून गेले आहे. हिरव्यागार शिखराच्या पायथ्यापासून आता सोनकीच्या पिवळ्या रंगाच्या जोडीला तांबडी, निळी फुले फुलली आहेत. शिखरावर जाणाºया पायवाटेच्या दुतर्फा फुललेली फुले पर्यटकांचा उत्साह द्विगुणित करत आहेत.
प्रकाश महाले ।
राजूर : नवरात्र उत्सवासाठी येणा-या भाविक आणि पर्यटकांबरोबर सुरु झालेल्या फुलोत्सवाने कळसूबाई शिखर बहरून गेले आहे. हिरव्यागार शिखराच्या पायथ्यापासून आता सोनकीच्या पिवळ्या रंगाच्या जोडीला तांबडी, निळी फुले फुलली आहेत. शिखरावर जाणाºया पायवाटेच्या दुतर्फा फुललेली फुले पर्यटकांचा उत्साह द्विगुणित करत आहेत.
अकोले तालुक्याचा पश्चिम पट्टा पर्यटनाचे आगार म्हणून ओळखले जाते. गियारोहण, दुर्गभ्रमंती, निसर्ग सहली आणि पर्यटनासाठी कळसूबाई, हरिश्चंद्रगड, रतनगड या भागाची वेगळी अशी ओळख आहे. ऋतुमानानुसार येथील निसर्ग बहरतो. वर्षा ऋतूच्या आरंभी सुरू होणारा काजवा उत्सव, त्यानंतरचा जलोत्सव आणि नवरात्राच्या आरंभी सुरू होणारा फुलोत्सव नेहमीच पर्यटकांना आकर्षित करतो. सध्या नवरात्र उत्सव सुरू आहे. हा उत्सव सुरु होण्यापूर्वीच फुलोत्सव सुरू झाला. सह्याद्रीच्या पर्वत रांगांतील सर्वच गड, शिखरे, छोटे मोठे पर्वत पायथ्यापासून ते शिखरापर्यंत सोनकीच्या पिवळ्या धम्मक फुलांबरोबर विविध रानफुलांनी बहरून गेले आहेत. कुठे खडकात तर कुठे दगड धोंड्यांतून डोकावणारे रानफुले भुरळ घालत आहेत. या सर्वच फुलांनी संपूर्ण शिखर फुलले आहे. नवरात्रौत्सवामुळे कळसूबाई शिखरावर भाविकांची भल्या पहाटेपासून रीघ सुरु आहे. दुसºया माळेपासून भाविकांची गर्दी वाढली. ही गर्दी दस-यापर्यंत राहणार आहे. भाविकांबरोबर राज्यातील गिर्यारोहक, पर्यटकांचीही गर्दी आहे. पाऊस झाल्याने निसर्गातील तजेला अद्यापही टिकून आहे.