कल्याण रोड परिसर टाकतोय कात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:16 AM2021-05-28T04:16:28+5:302021-05-28T04:16:28+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : अहमदनगर शहराच्या मध्यवस्तीपासून हाकेच्या अंतरावर असलेला कल्याण रोड परिसर आता कात टाकतोय. नवनवीन इमारती ...

Kalyan Road area is being demolished | कल्याण रोड परिसर टाकतोय कात

कल्याण रोड परिसर टाकतोय कात

लोकमत न्यूज नेटवर्क

अहमदनगर : अहमदनगर शहराच्या मध्यवस्तीपासून हाकेच्या अंतरावर असलेला कल्याण रोड परिसर आता कात टाकतोय. नवनवीन इमारती उभ्या राहत असून, आदर्श म्हणता येतील, अशा कॉलनी उभ्या राहत आहेत. म्हणूनच फूडमॉल, शॉपिंग कॉम्प्लेक्स, पेट्रोलपंप, सुसज्ज दवाखाने, जॉगिंग ट्रॅक, बगिचा अशा सुविधा या भागात उभ्या राहिल्या आहेत. त्याशिवाय अनेक छोट्या-छोट्या उद्योगांनीही या भागाच्या विकासाला हातभार लावला आहे.

अहमदनगर शहर आता ५३१ वर्षांचे झाले आहे. मध्यवस्तीतील अनेकजण आता नव्याने विकसित होणाऱ्या उपनगरांमध्ये राहायला जात आहेत. कल्याण रोड परिसरही आता एक नवीन उपनगर म्हणून उदयास आले आहे. शिवाजीनगर, आदर्शनगर, विद्या कॉलनी अशा उच्चशिक्षितांच्या कॉलनी उभ्या राहिल्या आहेत. नव्यानेही अनेक कॉलनींची यात भर पडली आहे.

मागील २० वर्षांच्या तुलनेत कल्याण रोड परिसराला चांगलीच झळाळी आली आहे. पूर्वी वेड्या बाभळींनी हा परिसर वेढलेला होता. रात्रीच्या वेळी सीना नदी ओलांडून येण्याचे धाडस कोणी करीत नव्हते. मात्र, आता हा परिसर माणसांनी गजबजला असून, चकाचक बंगले, कॉलनी उभ्या राहिल्या आहेत. सिमेंट, डांबरी मुलाम्याने अंतर्गत रस्ते चकाचक झाले आहेत. त्यामुळे या भागात फूडमॉल, शॉपिंग कॉम्प्लेक्स उभे राहिले. बाजारपेठ उदयास आली. सुसज्ज दवाखान्यांनी या भागातील नागरिकांचे आरोग्य जपण्यात सहयोग दिला. दळणवळणाची लाइफलाइन असलेला पेट्रोलपंपही या भागात सुरू झाला. मंगल कार्यालये उभी राहिली. नागरिकांना मॉर्निंग वॉकला जाता यावे यासाठी जॉगिंग ट्रॅक उभारण्यात आला. लोकांच्या विरंगुळ्यासाठी ३५ लाख रुपये खर्चून बगिचा उभा करण्यात आला आहे.

गणपती कारखान्यांसह इतर छोट्या उद्योगांनी या परिसरातील गरजूंना रोजगारही पुरविला आहे.

........................

पाणीप्रश्न सुटणे गरजेचे

कल्याण रोड परिसराची लोकसंख्या २५ हजारांच्या घरात पोहोचली आहे. या लोकसंख्येला मात्र अद्यापही पुरेसे पाणी उपलब्ध होत नाही. तत्कालीन लोकप्रतिनिधींनी या भागासाठी स्वतंत्र पाइपलाइनद्वारे पाणीपुरवठ्याची योजना आखली होती. त्यासाठी दहा वर्षांपूर्वी दहा लाख लिटर क्षमतेची पाण्याची टाकी उभारण्यात आली. मात्र, अद्यापही ती बंदच आहे. त्यामुळे सध्या तीन लाख लिटर क्षमतेच्या पाणी साठवण टाकीतून या भागाला पाणीपुरवठा होत आहे. आठ ते दहा दिवसांनी या भागात पिण्याचे पाणी सुटते. ही या भागातील गंभीर समस्या सोडविण्याची मागणी होत आहे.

...................

गटारींसाठी २८ कोटी मंजूर

नगर-कल्याण महामार्गालगत गटार काढण्यात आली नव्हती. त्यामुळे या भागातील पाण्याचा निचरा होत नव्हता. मात्र, आता या महामार्गाच्या दोन्ही बाजूंनी मोठ्या गटारीचे काम करण्यात येणार आहे. त्यासाठी २८ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. या गटारींची कामे झाल्यानंतर या भागातील पाणी निचऱ्याचा प्रश्नही बऱ्यापैकी मार्गी लागणार आहे.

................

जॉगिंग ट्रॅक, लॉन व ओपन स्पेस विकास अशी काही कामे मार्गी लावली आहेत. या भागातील पाणीप्रश्न व इतर सुविधांसाठी महापालिकेकडे पाठपुरावा सुरू आहे. आयुक्त शंकर गोरे यांच्याकडून चांगले सहकार्य मिळत असून, विकासकामांचे नियोजन करून हा परिसर आदर्श करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी नागरिकांनीही सहकार्य करणे गरजेचे आहे.

-श्याम नळकांडे, नगरसेवक

..............

या भागात चांगले मॉल उभे राहत आहेत. होलसेलची मोठी दुकाने सुरू होत आहेत. महामार्गालगत असल्यामुळे बाजारपेठ विकसित होत आहे. मात्र, महापालिकेकडून सुविधा मिळत नाहीत. पाणीप्रश्न ही येथील मोठी समस्या आहे. फेज-२चे काम गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेले आहे. येथील बाजारपेठेला चांगले दिवस यायचे असतील तर महापालिकेने पाणीप्रश्न तातडीने सोडविणे गरजेचे आहे.

-अंबादास नरसाळे, उद्योजक

Web Title: Kalyan Road area is being demolished

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.