कर्डिले, शेळके, पिसाळ, गायकवाड विजयी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:31 AM2021-02-23T04:31:14+5:302021-02-23T04:31:14+5:30
अहमदनगर : जिल्हा सहकारी बँकेच्या बिगरशेती मतदारसंघातून राष्ट्रवादीचे प्रशांत गायकवाड हे विजयी झाले आहेत. विविध कार्यकारी सोसायटी मतदारसंघातून माजी ...
अहमदनगर : जिल्हा सहकारी बँकेच्या बिगरशेती मतदारसंघातून राष्ट्रवादीचे प्रशांत गायकवाड हे विजयी झाले आहेत. विविध कार्यकारी सोसायटी मतदारसंघातून माजी आमदार शिवाजीराव कर्डिले, उदय शेळके आणि अंबादास पिसाळ हे विजयी झाले आहेत.
जिल्हा बँकेच्या चार जागांसाठी शनिवारी मतदान झाले. मतमोजणीला रविवारी सकाळी नऊ वाजता सुरुवात झाली. निवडणूक निर्णय अधिकारी दिग्विजय आहेर यांच्या उपस्थितीत पहिल्या टप्प्यात कर्जत, पारनेर आणि नगर तालुक्यातील विविध कार्यकारी सोसायटी मतदारसंघाची मतमोजणी करण्यात आली. पारनेर तालुक्यातील विविध कार्यकारी सोसायटी मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उदय शेळके हे ९९ मतांनी विजयी झाले. त्यांच्याविरोधात रामदास भोसले निवडणूक मैदानात होते. त्यांना ६ मते मिळाली. नगर तालुक्यातून भाजपचे माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी ९४ मते मिळविली. महाविकास आघाडीच्या उमेदवार सत्यभामा भगवान बेरड यांना १५ मते मिळाली. कर्जत तालुक्यात चांगलीच चुरस झाली. विखे गटाचे अंबादास पिसाळ एका मताने विजयी झाले. त्यांना ३७, तर काँग्रेसच्या मीनाक्षी साळुंके यांना ३६ मते मिळाली.
बिगरशेती संस्था मतदारसंघात महाविकास आघाडीचे प्रशांत गायकवाड व विखे गटाचे दत्ता पानसरे यांच्यात लढत होती. गायकवाड हे १८९ मतांनी विजयी झाले. गायकवाड यांना ७६३, तर पानसरे यांना ५७४ मते मिळाली.
बिगरशेती संस्था मतदारसंघात मतदारसंख्या १३७६ इतकी होती. यापैकी चार मते बाद झाली. एकाच मतदाराने दोघांना मतदान केल्याने एक मतपत्रिका बाद झाली. इतर तीन मतपत्रिका काेऱ्या होत्या. अशा चार मतपत्रिका बाद झाल्या.
....
तू आता आमदार होशील
विजयी झाल्यानंतर प्रशांत गायकवाड हे प्रमाणपत्र घेण्यासाठी कार्यकर्त्यांसह मतमोजणी केंद्रात आले. पराभूत उमेदवार दत्ता पानसरे हे मतमोजणी केंद्रात उपस्थित होते. गायकवाड यांनी पानसरे यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी पानसरे यांनी तू आता आमदार होशील, अशी भविष्यवाणी केली.
....
बिगरशेती संस्था मतदारसंघातील मतदान
प्रशांत गायकवाड
अकोले- ३५
जामखेड- ३०
कर्जत-३८
कोपरगाव-११४
नगर-८८
नेवासा-५२
पारनेर-४९
पाथर्डी-१२
राहाता-३४
राहुरी-५८
संगमनेर-१६४
शेवगाव-१९
श्रीगोंदा-३८
श्रीरामपूर-३२
......
दत्ता पानसरे
अकोले-२२
जामखेड-१६
कर्जत-२५
कोपरगाव-४४
नगर-१२८
नेवासा-३१
पारनेर-२९
पाथर्डी-१७
राहाता-९७
राहुरी-४२
संगमनेर-६४
शेवगाव-०३
श्रीगोंदा-२८
श्रीरामपूर- २८