तनपुरेंविरोधात कर्डिले-विखेंनी दंड थोपटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2018 06:21 PM2018-04-02T18:21:03+5:302018-04-02T18:23:59+5:30
तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या ५८ व्या गळीत हंगामात तनपुरे पिता पुत्रांविरोधात आमदार शिवाजी कर्डिले व डॉ. सुजय विखे यांच्यात कलगीतुरा रंगला. कारखान्यात मी हात घातला असून पुन्हा कारखाना विरोधकांच्या ताब्यात जाऊ देणार नाही, अशी घोषणा विखे यांनी केली.
राहुरी : तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या ५८ व्या गळीत हंगामात तनपुरे पिता पुत्रांविरोधात आमदार शिवाजी कर्डिले व डॉ. सुजय विखे यांच्यात कलगीतुरा रंगला. कारखान्यात मी हात घातला असून पुन्हा कारखाना विरोधकांच्या ताब्यात जाऊ देणार नाही, अशी घोषणा विखे यांनी केली. हाच धागा पकडत कर्डिलेंनी पक्ष बाजूला ठेऊन प्रसाद तनपुरे यांच्या ताब्यात एकही संस्था जाऊ दिली जाणार नाही. त्यासाठीच विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांच्याशी राजकीय सोयरीक केल्याचा निर्वाळा दिला.
डॉ. सुजय विखे यांनी तत्कालीन सत्ताधाऱ्यांवर तोफ डागत त्यांचा समाचार घेतला. आ. कर्डिले हे थेट सभास्थानी येण्याऐवजी कारखान्यात मशनरी आहे का ते पहाण्यासाठी कारखान्यात गेले. पुर्वीच्या सत्ताधा-यांनी नटबोलटासह सामान घरी नेले. आम्ही बंद पडलेला कारखाना सुरू करून चपकराक दिल्याचा टोला विखेंनी लगावला. चोरी भ्रष्टाचार करणारे घरी गेले आहेत. आम्ही निकृष्ट कारखाना सुरू केला असून पुढील वर्षी साडेपाच लाख टन ऊ साचे गाळप करू अशी ग्वाही देताच उपस्थितांनी टाळयांच्या गजराज स्वागत केले. पुढील वर्षी बाहेरून भुसा विकत आणावा लागणार नसुन शासनाच्या साखर धोरणावर विखे यांनी कर्डीले यांच्याकडे पहात टिकाही केली.
विखे यांच्या भाषणाचा धागा पकडून आमदार शिवाजी कर्डीले म्हणाले, मी विखेेंना मदत केली हे खरे असले तरी सर्व डाव शिकविलेले नाहीत. पुर्वी तनपुरे यांनी पाप झाकविण्यासाठी कामगारांच्या नावाने बदनामी केली. ३०० कोटी रूपयांचे पाप झाकविण्यासाठी तो एक टाकलेला डाव होत. क़ारखान्याच्या माध्यमातुन राजकारणावर खर्च करणा-यांना यापुढे एकही सत्ता हाती येऊ दिली जाणार नाही. त्यासाठी विखेंशी संगणमत केले असून वकील म्हणून कारखान्याला सर्वोैतोपरीने मदत करण्याची घोषणा आमदार कर्डीले यांनी केली.
प्रास्तविकात अध्यक्ष उदयसिंह पाटील यांनी सांगितले, यंदाच्या गळीत हंगामात २ लाख १९ हजार टन ऊसाचे गाळप करण्यात आले आहे. क़ामगार युनियनचे अध्यक्ष ज्ञानदेव आहेर यांचेही भाषण झाले. सुत्रसंचालन गणेश विघे यांनी केले. आभार सुरसिंग पवार यांनी मानले.