कर्जत-जामखेडच्या शेतकऱ्यांना मिळणार ४५ लाखांचे अनुदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:38 AM2021-03-04T04:38:44+5:302021-03-04T04:38:44+5:30
जामखेड/कर्जत : डिसेंबर २०१९ ते जानेवारी २०२० या कालावधीत गारपीट व अवेळी झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतपिकांचे नुकसान झाले होते. ...
जामखेड/कर्जत : डिसेंबर २०१९ ते जानेवारी २०२० या कालावधीत गारपीट व अवेळी झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतपिकांचे नुकसान झाले होते. यामध्ये प्रामुख्याने कर्जत तालुक्यातील १० व जामखेड तालुक्यातील १९ अशा २९ गावांतील ६७८ शेतकऱ्यांना ४५ लाख १३ हजार मंजूर झाले असून लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार असल्याची माहिती आमदार रोहित पवार यांनी दिली.
डिसेंबर २०१९ व जानेवारी २०२० मध्ये अतिवृष्टी व गारपिटीचा मोठा फटका बसला होता. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळणे आवश्यक होते. यासाठी नुकसानग्रस्त पिकांची अधिकाऱ्यांसह बांधावर जाऊन पाहणी केली होती. तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले होते आणि याबाबत पाठपुरावाही केला होता. आता कर्जत तालुक्यासाठी तिसऱ्या टप्प्यातील मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होणार असल्याची माहिती पवार यांनी दिली.
कर्जत तालुक्यातील १० गावांतील २८७ शेतकऱ्यांना १८ लाख ११ हजार रुपयांचे अनुदान, तर जामखेड तालुक्यातील १९ गावांतील ३९१ शेतकऱ्यांना २७ लक्ष दोन हजार रुपयांचे अनुदान प्राप्त झाले आहे. ही रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येणार आहे. शेतपिकांचे पंचनामे करून राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषानुसार व दरानुसार बाधित शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी आवश्यक असलेल्या मदतीचा तपशील कृषी आयुक्तांमार्फत पाठवण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. संयुक्त पंचनामे झाल्यानंतर ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून मदत जाहीर करण्यात आली होती. यापूर्वी कर्जत तालुक्यासाठी पहिल्या टप्प्यात १२ कोटी ५९ लक्ष एवढी रक्कम आली होती. दुसऱ्या टप्प्यात पाच कोटी १० लक्ष एवढी रक्कम आली होती.