कर्जत- जामखेडला मिळणार कुकडीचे पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 02:06 PM2018-03-22T14:06:35+5:302018-03-22T14:07:07+5:30
कुकडी प्रकल्पाच्या सुधारित प्रकल्पानुसार कर्जत-जामखेड तालुक्यातील गावांना कुकडी धरणाचे पाणी मिळणार आहे. याबाबत मृद व जलसंधारण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांच्या पुढाकाराने जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या निवासस्थानी बैठक झाली.
अहमदनगर : कुकडी प्रकल्पाच्या सुधारित प्रकल्पानुसार कर्जत-जामखेड तालुक्यातील गावांना कुकडी धरणाचे पाणी मिळणार आहे. याबाबत मृद व जलसंधारण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांच्या पुढाकाराने जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या निवासस्थानी बैठक झाली. या बैठकीत कर्जत-जामखेड तालुक्याला कुकडीचे पाणी उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेण्यात आला.
तुकाई चारीसह चौंडी, दिघी, जवळा बंधारे, पाटेवाडीसह इतर बंधा-यांत कुकडीचे पाणी सोडले जाणार आहे. कुकडी प्रकल्पाच्या डाव्या कालव्यामधून भोसे खिंड बोगद्याद्वारे सीना मध्यम प्रकल्पामध्ये २२५ दशलक्ष घनफूट पाणी देण्यास मान्यता देण्यात आली. याबाबत कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या कार्यकारी अभियंत्यांना शासनाने सूचनादिल्या आहेत. कुकडी डावा कालव्याचे कर्जतमधील निमगाव चारी, त्यापुढे अंदाजे ९ किलोमीटर नाल्याव्दारे व नदी पात्रामधून चौंडी, दिघी व जवळा बंधा-यामध्ये पाणी सोडले जाणार आहे. तुकाई उपसा सिंचन योजना आणि बिटकेवाडी पाझर तलावातील सध्याच्या पाझर तलावाचे काम प्रचलित नियमानुसार करण्यात येणार असून जलसंधारण विभाग कामे पूर्ण करणार आहे.