कर्जत पंचायत समिती : भाजपला झटका : सभापतीपदी निवडीनंतर कदम पुन्हा राष्ट्रवादीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2019 12:38 PM2019-05-21T12:38:58+5:302019-05-21T12:39:07+5:30
एकाच दिवसात राष्टÑवादीतून भाजप व पुन्हा भाजपमधून राष्टÑवादी असा प्रवास केल्यानंतर साधना अंकुश कदम यांची सोमवारी कर्जत पंचायत समितीच्या सभापतीपदी बिनविरोध निवड झाली.
कर्जत : एकाच दिवसात राष्टÑवादीतून भाजप व पुन्हा भाजपमधून राष्टÑवादी असा प्रवास केल्यानंतर साधना अंकुश कदम यांची सोमवारी कर्जत पंचायत समितीच्या सभापतीपदी बिनविरोध निवड झाली. सभापतीपद आपल्याच पक्षाला मिळाल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपकडून करण्यात येत आहे. तिसऱ्या अपत्याच्या कारणामुळे पूर्वीच्या सभापती पुष्पा शेळके यांना अपात्र ठरविल्यामुळे हे पद रिक्त झाले होते. त्यांच्या राजीनाम्यानंतर सोमवारी सभापती निवड प्रक्रिया झाली.
राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून आलेल्या साधना कदम यांनी सभापती निवडीच्या पूर्वसंध्येस रविवारी चौंडी येथे जलसंधारण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे आणि भाजप-शिवसेना पदाधिकाऱ्यांसमक्ष भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्याचे छायाचित्रही भाजप पदाधिकाºयांनी सोशल मीडियावर व्हायरल केले होते.
सोमवारी कदम यांनी दाखल केलेले दोन्ही अर्ज वैध ठरले होते. पीठासीन अधिकारी तथा प्रांताधिकारी अर्चना नष्टे यांनी कदम यांची बिनविरोध निवड केली. यावेळी पंचायत समिती आवारात युतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. निवड होताच कदम सभागृहाबाहेर निघून गेल्या. सभागृहाबाहेर जाताना त्यांना भाजप पदाधिकाºयांनी हटकले, मात्र त्यांचे अभिनंदन स्वीकारण्याऐवजी त्या राष्ट्रवादीचे पंचायत समिती सदस्य राजेंद्र गुंड यांच्या वाहनातून निघून गेल्या. त्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर ‘राष्ट्रवादीचाच सभापती’असा मजकूर व्हायरल केला. तालुक्यातील कुळधरण येथे नवनिर्वाचित सभापतींचा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी सत्कार केला.
भाजपमध्ये अस्वस्थता; राष्ट्रवादी सावध
सभापती निवडीच्या पूर्वसंध्येला चौंडी येथे पालकमंत्री राम शिंदे व युतीच्या पदाधिकाºयांसमक्ष भाजपमध्ये प्रवेश दिल्याचे जाहीर करून पंचायत समितीवर पुन्हा भाजपचेच वर्चस्व असल्याचा दावा केला.
सोशल मीडियावर तशा पोस्टही फिरल्या. सोमवारी सकाळी मात्र भाजपचे एक सदस्य राष्ट्रवादीच्या गळाला लागल्याच्या पोस्टही व्हायरल झाल्या. कदम सभापतीपदी विराजमान होताच त्या राष्ट्रवादी गटाच्या संपर्कात गेल्याने भाजपच्या गोटात अस्वस्थता निर्माण झाली.
भाजपचे कार्यकर्ते हिरमुसले
कदम यांची सभापती निवड झाल्यानंतर पंचायत समिती परिसरात निवडीचा कुठलाही जल्लोष न होता एकच शांतता निर्माण झाली.
तिथे असलेल्या भाजप-शिवसेना पदाधिका-यांची भेट कदम यांनी टाळल्याने तेही परिसरातून निघून गेले. तर कदम यांचा राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सत्कार केल्याने भाजपच्या गोटात शांतता पसरली. दरम्यान भाजप व राष्ट्रवादीने आमच्याच पक्षाचा सभापती असल्याचा दावा केला आहे.
कर्जत पंचायत समितीवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकला आहे. भाजप, शिवसेनेसह अपक्षांच्या मदतीने साधना कदम या सभापतीपदी बिनविरोध विराजमान झाल्या आहेत. त्यांच्यावर कोणीही दावा करू नये. आम्हीच सभापती केला आहे. सर्वांनी मिळून निवड केली. राष्ट्रवादी काँग्रेसचा सभापती झाला हे सत्य आहे. - राजेंद्र फाळके, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस.