दरोड्याच्या तयारीतील टोळी कर्जत पोलिसांनी पकडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2018 12:50 PM2018-05-26T12:50:31+5:302018-05-26T12:51:05+5:30
दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात असलेल्या टोळीतील चौघांना कर्जत पोलिसांनी पाठलाग करून रंगेहाथ पकडले. त्यांच्याकडून एक गावठी कट्ट्यासह जिवंत काडतुसे व एक चारचाकी वाहन ताब्यात घेतले आहे.
कर्जत : दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात असलेल्या टोळीतील चौघांना कर्जत पोलिसांनी पाठलाग करून रंगेहाथ पकडले. त्यांच्याकडून एक गावठी कट्ट्यासह जिवंत काडतुसे व एक चारचाकी वाहन ताब्यात घेतले आहे.मिथुन मारूती पालघर (वय ३२), अनिल अंकुश शिंदे (वय-३५), सुनिल गजानन खानेकर (वय-२८), सुधीर निमसे (वय-३१) (सर्व राहणार- मुळशी. जिल्हा- पुणे) यांना कर्जत पोलिसांनी अटक केली आहे. कर्जत - श्रीगोंदा रोडवर पोलिसांनी ही कारवाई केली.
कर्जत तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र चव्हाण यांना दुरगाव तलावाजवळ एक संशयास्पद चार चाकी गाडी उभी असल्याची खबर मिळाली. त्यानंतर चव्हाण यांनी पोलीस पथक घेऊन खाजगी गाडीने दुरगांव तलाव गाठला. उभ्या असलेल्या चारचाकी वाहनातील आरोपींनी गाडी भरधाव वेगाने श्रीगोंदा रोडने पळवली. पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग सुरू केला. याबाबत श्रीगोंदा पोलीसांना माहिती देत नाकाबंदी करण्यास सांगितले. श्रीगोंदा पोलिसांनी हिरडगांव फाटा येथे तात्काळ नाकाबंदी केली. तेथेच वाहनासह चार आरोपी सापडले तर दोन आरोपी पळून गेले. पोलिसांनी कारची झडती घेतली असता त्यामध्ये एक गावठी कट्टा व सहा जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. मिथुन मारूती पालघर (वय ३२), अनिल अंकुश शिंदे (वय-३५), सुनिल गजानन खानेकर (वय-२८), सुधीर निमसे (वय-३१) (सर्व राहणार- मुळशी. जिल्हा- पुणे) यांना कर्जत पोलिसांनी अटक केली आहे.
या पथकात पोलीस निरीक्षक राजेंद्र चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक शहादेव पालवे, पोलिस कॉन्स्टेबल सुनिल खैरे, सागर जंगम, फिरोज पठाण, अमोल चनै, इरफान शेख, रमेश जाधव यांचा समावेश होता. या प्रकरणात फरार झालेल्या दोन आरोपींचा शोध कर्जतचे पोलीस घेत आहेत.