कर्जत तालुक्यात शेतजमिनीच्या वादातून सख्ख्या भावाचा निर्घृण खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2018 06:58 PM2018-05-08T18:58:20+5:302018-05-08T19:00:41+5:30
वडिलोपार्जीत शेतजमिनीच्या वाटपावरुन झालेल्या भांडणात दोन भावांनी मेहुणा व दोन मुलांच्या मदतीने सख्ख्या भावाचा निर्घृण खून केल्याची कर्जत तालुक्यातील भांबोरा गावातील यमाईनगर येथे रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास या प्रकरणी चौघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.
राशीन(कर्जत) : वडिलोपार्जीत शेतजमिनीच्या वाटपावरुन झालेल्या भांडणात दोन भावांनी मेहुणा व दोन मुलांच्या मदतीने सख्ख्या भावाचा निर्घृण खून केल्याची कर्जत तालुक्यातील भांबोरा गावातील यमाईनगर येथे रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास या प्रकरणी चौघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.
हनुमंत कोंडीबा चव्हाण (वय ५५) हे खून झालेल्याचे नाव आहे. याबाबत मयताचा मुलगा राहुल हनुमंत चव्हाण (वय २७) याने दिलेल्या फिर्यादिवरून रमेश कोंडीबा चव्हाण, किरण रमेश चव्हाण, गणेश रमेश चव्हाण (सर्व रा.यमाईनगर, भांबोरा, ता.कर्जत) ) व सुनिल रामदास पवार (रा.धुगलवडगाव ता.श्रीगोंदा) या चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आठ वर्षांपुर्वी वडीलांच्या जमिनीतील बहिण भामाबाई सजेर्राव शितोळे यांच्या हिश्याची प्रत्येकी अर्धा एकर शेतजमीन हनुमंत व रमेश या दोघा भावांनी विकत घेतली. सहा वर्षांपुर्वी हनुमंत यांना पैशाची गरज असल्याने घेतलेली अर्धा एकर जमीन भाऊ रमेश यांचे मेहुणे सुनिल रामदास पवार यांना तीन लाखाला परत देण्याच्या बोलीवर खरेदी खताने विकली. पवार यांनी ही जमीन रमेश चव्हाण यांच्या पत्नीच्या नावे खरेदी केली. पाच महिन्यांपुर्वी हनुमंत यांचे कडे पैसे आल्यानंतर तीन लाख रुपये घेऊन गेले. जमीन परत देण्याच्या बोलीप्रमाणे सुनिल पवार यांच्या जमिनीची मागणी केली. पंरतु पवार जमीन परत करण्याचा नकार दिला. यातून सुनिल व भाऊ रमेश यांच्यात वाद सुरू झाला. या वादात सुनिल पवार हस्तक्षेप करीत मेहुणे रमेश सतत बाजू घेत हनुमंतवर दबाव आणत होता असे फिर्यादित म्हटले आहे.
रविवारी सांयकाळी जमिनीच्या वादावरुन उभयतांमध्ये वाद झाला. त्याचे पर्यावसान हाणामारीत झाले. यावेळी सुनिल पवार यांनी दोघा भावांना आपण जमीन मोजून घेऊ, असा सल्ला दिला. मात्र रमेश यांनी न ऐकता हनुमंतला शिवीगाळ करण्यास सुरूवात केली व फावडे घेतले. त्यानंतर त्यांची दोन मुले किरण व गणेश अनुक्रमे लाकडी दांडके व लोखंडी कुदळ घेऊन हनुमंत यांच्या अंगावर धावले. यावेळी त्यांच्यात जोराची बाचाबाची झाली. त्याचवेळी मयत हनुमंत यांची राहुल व महेंद्र ही मुले भांडण सोडवण्यासाठी गेले. यावेळी रमेश यांनी हनुमंतला पकडले. किरण चव्हाण याने लाकडी दांडक्याने मारहाण केली. गणेश याने कुदळीने चुलत्याच्या डोक्यात प्रहार केला. या जबर मारहाणीमुळे मोठा रक्तस्राव होऊन हनुमंत ते बेशुध्द पडले. त्यानंतर मारहाण करणारे तिघेजण घटनास्थळावरून पळून गेले. दरम्यान, हनुमंत चव्हाण यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले. खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पंरतु डॉक्टरांनी चव्हाण यांना मृत घोषीत केले. लोणीकाळभोर पोलीसात याप्रकरणी गुुन्ह्याची नोंद झाली असून तो राशीन पोलीसात वर्ग करण्यात आला. पुढील तपास राशीन दुरक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक वैभव महांगरे करीत आहेत. घटनेनंतर तिघेजण घटनास्थाळावरून पसार झाले. आरोपींचा शोध सुरु असल्याचे राशीनचे पोलीस उपनिरीक्षक वैभव महांगरे यांनी सांगितले.