कर्जतमध्ये विद्यार्थ्याला शिक्षकाकडून अमानुष मारहाण, शिक्षकाच्या विरोधात गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2018 03:29 PM2018-04-13T15:29:33+5:302018-04-13T15:39:44+5:30
तालुक्यातील पिंपळवाडी येथे जिल्हा परिषद शाळेतील एका शिक्षकाने इयत्ता दुसरीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याकडून गणित चुकल्याचा राग आल्याने मारहाण करीत गंभीर जखमी केले. या मारहाणीत विद्यार्थ्याच्या टाळ्याला गंभीर दुखापत झाली असून, त्याला उपचारासाठी पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
कर्जत (जि. अहमदनगर) : तालुक्यातील पिंपळवाडी येथे जिल्हा परिषद शाळेतील एका शिक्षकाने इयत्ता दुसरीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याकडून गणित चुकल्याचा राग आल्याने मारहाण करीत गंभीर जखमी केले. या मारहाणीत विद्यार्थ्याच्या टाळ्याला गंभीर दुखापत झाली असून, त्याला उपचारासाठी पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. मंगळवारी (दि. १० एप्रिल) सकाळी अकराच्या सुमारास हा प्रकार घडला. या प्रकरणी कर्जत पोलिस ठाण्यात शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
कर्जत तालुक्यातील कुळधरणनजीकच्या पिंपळवाडी येथील रोहन दत्तात्रय जंजिरे या दुसरीत शिकणा-या विद्यार्थ्याला ही अमानुष मारहाण झालेली आहे. चंद्रकांत सोपान शिंदे असे या मारहाण करणा-या शिक्षकाचे नाव असून, ते राशीन येथील रहिवासी आहेत. रोहनकडून गणित चुकल्यामुळे शिक्षकाने हा प्रकार केला असल्याचे समोर येत आहे. लाकडी छडी तोंडात घालून मारहाण केल्याने रोहनच्या तोंडात गंभीर दुखापत झालेली आहे. पडजिभेमागील बाजू तुटल्याने त्याला श्वास घेण्यात अडचणी येत असल्याची माहिती रोहनचे वडील दत्तात्रय जंजिरे यांनी दिली.
या अमानुष प्रकाराबाबत विद्यार्थ्याची आई सुनीता दत्तात्रय जंजिरे यांनी कर्जत पोलीस स्टेशनला शिक्षक चंद्रकांत सोपान शिंदे याच्याविरोधात पोलिसांनी भादंवि कलम ३२४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला असून, पोलीस हेड कॉन्स्टेबल एम. आर. गाडे हे पुढील तपास करीत आहेत.
शिक्षणाधिका-यांनी केले शिक्षकाचे निलंबन
विद्यार्थ्याला मारहाणीचा प्रकार समोर आल्यानंतर कर्जतच्या शिक्षण विभागाने पिंपळवाडी येथे येऊन विद्यार्थी, तसेच पालकांचे जबाब घेतले. त्यानुसार जिल्हा परिषदेला अहवाल सादर केला. त्यानुसार शिक्षण विभागाने त्या शिक्षकावर निलंबनाची कारवाई केली. तसा आदेश आज काढण्यात आला आहे. या घटनेची माहिती समजताच कर्जतचे गटशिक्षणाधिकारी अनिल शिंदे यांनी पिंपळवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला भेट देऊन संतप्त ग्रामस्थांशी चर्चा केली. जखमी रोहनला उपचारासाठी सुरूवातीला राशीन हलवले. येथून त्याला उपचारासाठी बारामती येथे हलविले. तेथे देखील योग्य उपचार झाले नसल्याने रोहनला पुणे येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. शिक्षकाने केलेल्या या मारहाणीचा ग्रामस्थांनी निषेध केला असून, पालकांत संतापाचे वातावरण आहे.