कर्जतकरांनी रांगा लावून खरेदी केल्या शाडू मातीच्या गणेश मूर्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2021 04:22 AM2021-09-11T04:22:54+5:302021-09-11T04:22:54+5:30

कर्जत : येथील नागरिकांनी पर्यावरणपूरक शाडू मातीच्या गणेश मूर्ती शुक्रवारी अक्षरश: रांगा लावून खरेदी केल्या. दिवसभरात पाचशे गणेशमूर्तींची विक्री ...

The Karjatkars lined up and bought shadu clay idols of Ganesha | कर्जतकरांनी रांगा लावून खरेदी केल्या शाडू मातीच्या गणेश मूर्ती

कर्जतकरांनी रांगा लावून खरेदी केल्या शाडू मातीच्या गणेश मूर्ती

कर्जत : येथील नागरिकांनी पर्यावरणपूरक शाडू मातीच्या गणेश मूर्ती शुक्रवारी अक्षरश: रांगा लावून खरेदी केल्या. दिवसभरात पाचशे गणेशमूर्तींची विक्री झाली. नगरपंचायतीने अल्प दरात नागरिकांसाठी गणेश मूर्ती उपलब्ध करून दिल्या.

यासाठी मुख्याधिकारी गोविंद जाधव, अधिकारी, कर्मचारी यांनी नियोजन केले होते. नगरपंचायतीने स्वच्छ सर्वेक्षण २०२१मध्ये सहभाग घेऊन उल्लेखनीय कामगिरी केली. माझी वसुंधरा भाग एक या स्पर्धेत राज्यात दुसरा क्रमांक पटकाविला. आता माझी वसुंधरा भाग दोनमध्येही नगरपंचायतीने सहभाग घेतला आहे.

यावर्षी नगरपंचायतीने पर्यावरण पूरक गणेश स्पर्धा आयोजित करून वेगळा उपक्रम हाती घेतला आहे. नगरपंचायतीने पर्यावरण पूरक गणेश स्पर्धेचा श्रीगणेशा करताना शहरातील ज्या गणेश भक्तांना त्या हव्या असतील अशांची नावनोंदणी केली. शुक्रवारी नगरपंचायतीच्या आवारात या गणेश मूर्ती घेण्यासाठी कर्जतकरांनी रांगा लावल्या. मूर्तीचे ऐच्छिक शुल्क आकारण्यात आले. या गणेश मूर्ती शाडूच्या मातीपासून बनविण्यात आल्या आहेत. रंगही नैसर्गिक देण्यात आले आहेत. १३ सप्टेंबर रोजी पर्यावरण पूरक गणेश सजावटीचा फोटो नगरपंचायतीच्या व्हॉट्सॲपवर पाठवायचा आहे.

---

वृक्षारोपण अन् ५१ स्पर्धकांना पैठणीची भेट..

विसर्जनाच्या दिवशी या मूर्तींचे कुंडी, अंगणातील झाडाच्या आळ्यात, बादलीत, हौद यामध्ये करावयाचे आहे. कुंडीत किंवा अंगणात विसर्जन केलेल्या मातीत बाप्पाच्या स्मरणार्थ एक झाड, रोप लावायचे आहे. तो सेल्फी नगरपंचायतीने दिलेल्या क्रमांकावर पाठवायचा आहे. प्रत्येक महिन्याच्या १४ तारखेला लावलेल्या रोपासोबत सेल्फी घेऊन तो नगरपंचायतीला पाठवायचा आहे. मकर संक्रांतीला या स्पर्धेतील ५१ स्पर्धेकांना पैठणी देऊन गौरविण्यात येणार आहे.

---

कर्जत शहरातील प्रत्येकाने आपल्या घरापासून निसर्ग रक्षणाला सुरुवात करावी. यामुळे मोठ्या प्रमाणावर पर्यावरण संवर्धन होईल. शहर स्वच्छ व सुंदर होण्यास हातभार लागेल. यामुळे पर्यावरण पूरक गणेश स्पर्धेची संकल्पना राबविण्यात येत आहे.

-गोविंद जाधव,

मुख्याधिकारी, नगरपंचायत, कर्जत

----

१० कर्जत गणेश

शाडूच्या मूर्ती घेण्यासाठी कर्जत शहरातील गणेश भक्तांनी लावलेली रांग.

Web Title: The Karjatkars lined up and bought shadu clay idols of Ganesha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.