कर्जतची अद्ययावत स्मशानभूमी बनली पर्यटनस्थळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2019 02:09 PM2019-09-22T14:09:04+5:302019-09-22T14:09:45+5:30
दोन कोटी रुपये खर्चून कर्जत नगरपंचायतीने स्मशानभूमी उभारली आहे. पर्यटनस्थळासारखे देखणे काम करण्यात आल्यामुळे ही स्मशानभूमी पाहण्यासाठी अनेकजण येथे हजेरी लावत आहेत़
मच्छिंद्र अनारसे ।
कर्जत : दोन कोटी रुपये खर्चून कर्जत नगरपंचायतीने स्मशानभूमी उभारली आहे. पर्यटनस्थळासारखे देखणे काम करण्यात आल्यामुळे ही स्मशानभूमी पाहण्यासाठी अनेक जण येथे हजेरी लावत आहेत़
कर्जत शहर व उपनगरात स्मशानभूमीची गैरसोय होती. याची दखल घेऊन कर्जत नगरपंचायतीचे तत्कालीन नगराध्यक्ष नामदेव राऊत यांनी पालकमंत्री राम शिंदे यांच्याकडे ही समस्या मांडली होती. सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील शिरवळ येथील स्मशानभूमी प्रमाणे कर्जत येथील स्मशानभूमी तयार करण्याचा प्रस्ताव सरकारकडे सादर केला यासाठी राज्य सरकारने वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून २ कोटी रुपये मंजूर केले. यातून येथे शवदहनचे चार युनिट, अंत्यविधीसाठी येणा-यांना प्रशस्त स्वतंत्र बैठक व्यवस्था केली आहे़ जैन समाजासाठी स्वतंत्रपणे चौथारा तयार केला आहे. दुखांकित परिवारासाठी बसण्याची वेगळी व्यवस्था केली आहे़ दशक्रिया विधीसाठी स्वतंत्र घाट तयार केला आहे़ या स्मशानभूमीच्या प्रवेश द्वारावर संत तुकाराम महाराज यांचा वैकुंठ गमनाचा पुतळा बसविला आहे़ पंचमहाभुते असलेले प्रवेशद्वार तयार करण्यात आले आहे़ चौकीदाराची नेमणूक केली आहे़ विसावा ठिकाण, शिवमंदिर, पाप-पुण्याचे स्तंभ उभारण्यात आले आहेत़ मुंडण चौथरा, आंघोळीची सुविधा, पुरूष व महिला यांच्यासाठी स्वतंत्र स्वच्छता गृह उभारण्यात आले आहे़ १० हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी, चप्पल स्टॅन्ड, अंत्यसंस्कारावेळी महिला व पुरुष यांना स्वतंत्रपणे बसण्याची व्यवस्था केली आहे़ गोरगरिबांना अस्ती विसर्जन सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे़ अंत्यसंस्कारासाठी जे साहित्य लागते तेही एकाच ठिकाणी मिळण्याची व्यवस्था केली आहे़ नगराध्यक्षा प्रतिभा भैलुमे, उपनगराध्यक्ष नामदेव राऊत, मुख्याधिकारी धनंजय कोळेकर यांनी या कामाबाबत समाधान व्यक्त केले.