सामाजिक कार्यातील कर्मयोगिनी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2019 05:42 PM2019-08-19T17:42:16+5:302019-08-19T17:42:26+5:30
अहमदनगरच्या थोर समाजसेविका, स्वातंत्र्यसैनिक जानकीबाई आपटे यांनी ८०-९० वर्षापूर्वी, स्वातंत्र्य चळवळ, अस्पृश्यता निवारण, महिला संघटन, विधवा व वेश्या पुनर्वसन, शिक्षण, सहकारी चळवळ, हिंदू-मुस्लिम ऐक्य आदी विविध क्षेत्रात, समर्पित भावनेने विधायक कर्तृत्वाचे मनोहारी इमले उभारले. व्यक्तिगत फायद्याची अभिलाषा न ठेवता, त्यांनी अनेक विविध कार्ये यशस्वी केली़ त्या अर्थाने त्या कर्मयोगिनी होत्या.
अहमदनगर - आयुष्याची सुरुवात अतिशय सामान्य चार-चौघींसारखी कनिष्ठ मध्यमवर्गीय ब्राह्मण कुटुंबात झाली. वयाच्या चौथ्या वर्षी पितृछत्र हरपले. पुढील वास्तव्य काही काळ बार्शीच्या टिळक मामाकडे होते. त्यांच्या घरी लोकमान्य टिळक दौºयावर असताना उतरत. अशा देशभक्तीच्या वातावरणात संस्कार झाले असावे. काही काळ पुणे येथे बहिणीकडे गेला. ते फडके घराणे पुरोगामी विचारांचे होते.
प्रथेप्रमाणे वयाच्या २१ व्या वर्षी पुणे येथे १९०६ साली विवाह झाला. अंबू वासुदेव दाते यांनी नगरला जानकी परशुराम आपटे म्हणून पदार्पण केले. पती-परशुराम तथा तात्यासाहेब (वय २८) शिक्षक होते. ओढगस्तीचा (१९२७-२८ पर्यंत) संसार परंपरागत पद्धतीने सासू-सासरे, नणंदा नातेसंबंध जपत चालू होता. त्यांना पाच मुले (३ मुली, २ मुले)़ आर्थिक ताण वाढल्यामुळे संसाराला हातभार व्हावा, या हेतूने जवळच सेवासदनमध्ये शिवण क्लासचे शिक्षण घेतले. घरी झबली, गलोनी, चोळ्या शिवण करून विक्री सुरू केली. शिवण क्लासही सुरू केला. त्यामुळे बाहेरच्या महिलांशी संपर्क झाला. त्यांची सुखदु:खे अडीअडचणी समजू लागल्या.
जानकीबाई आपटे यांच्याकडे शिवण क्लासला एक कानडी बालविधवा सोवळे नेसून येत असे. केशवपन व कुंकवाविना कपाळ रोज पाहून जानकीबाई अस्वस्थ होत. जानकीबार्इंनी मायेने तिला कुंकू लावण्यास सुचविले. पण घरच्या कर्मठ वातावरणाने ती तयार होईना. जानकीबार्इंनी तिच्या घरी जाऊन संवाद साधला. वाद झाला. परंतु यथावकाश केस वाढविण्यास परवानगी मिळाली. नंतर ती १-२ वर्षांनी कुंकूही लावू लागली. मग जानकीबार्इंनी तिच्या कुटुंबाला राजी करून तिचा पुनर्विवाह लावून दिला. धाडसाने परंपरा व रूढीला छेद देणारे हे पाऊल होते. जानकीबार्इंची उमेद वाढली. अशीच पुरोगामी दृष्टी त्यांनी स्वत:च्या मुली-मुलांचे विवाह नोंदणी (रजिस्टर) पद्धतीने (१९३८, १९३८, १९४१) लावून दिली. अर्थात यास त्यांच्या पती तात्यासाहेबांचा सुधारणावादी दृष्टिकोन व पाठिंबा महत्त्वाचा होता.
१९३० साली काँग्रेसच्या थोर नेत्या कमलादेवी चटोपाध्याय यांच्या मिठाच्या सत्याग्रहाच्या निमित्ताने नगरला गांधी मैदानात बेकायदा मिठाची विक्री केली व स्फूर्तीदायक भाषण केले. जानकीबाई सभेस उपस्थित होत्या. त्या प्रभावित होऊन अस्वस्थ झाल्या. आपणही महिला एकत्रित करून काहीतरी राष्टÑीय जागृतीचे काम करावे, अशी उत्कट इच्छा निर्माण झाली. स्वभावाप्रमाणे त्यांनी ध्यास घेतला व त्यावेळचे काँग्रेस पुढारी काकासाहेब गरूडांकडे गेल्या. विचारविनिमयानंतर लगेच धरपकड होणार नाही, अशी अराजकीय संस्था महिलांसाठी काढण्याचे ठरविले. स्त्रियांशी संपर्क साधून १९३० साली हिंदसेविका संघाची स्थापना झाली. गरुडांनी आपला घरचा दोन-अडीचशे महिला बसू शकतील, असा हॉल संस्थेच्या कार्यासाठी मोफत वापरण्यास दिला.
थोेर पुरुषांची जयंती-पुण्यतिथी, व्याख्याने होऊ लागली. हळदी-कुंकू व पाच दिवसांचा सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला. महिलांसाठी सभासद फी प्रत्येकी दर महिना दोन आणे व एक सूताची लड अशी ठेवण्यात आली. प्रभात फेरी, दारू दुकानावर निषेध सभा यांमध्ये स्त्रिया उत्साहाने भाग घेऊ लागल्या.
मध्यमवर्गीय स्त्रियांना एक नवे अवकाश लाभले. काही स्त्रियांनी संध्याकाळी रोज एकत्र गप्पा, खेळ, मनोरंजनासाठी लहान मुलांना सोबत घेऊन येता येईल, असा क्लब काढावा असे सुचविले. कल्पनेत रमणे हा जानकीबार्इंचा स्वभाव नव्हता. धनगर गल्लीत त्यांच्या घराजवळ, रावसाहेब पटवर्धन यांची एक रिकामी बखळ व तबेला होता. समोर पटांगण होते. जानकीबार्इंनी लगेच रावसाहेबांची भेट घेतली. महिलांसाठी तबेला व बखळ वापरण्यास मिळण्याचा प्रस्ताव ठेवला. त्यांनी विचार करून परवानगी दिली. पटांगण मिळवण्यासाठी त्यावेळचे नगरपालिकेचे चीफ आॅफिसर बाबासाहेब हिवरगावकर यांना भेटून पटांगण वापरण्याची परवानगी मिळाली. कंपाऊंड उभे करण्यास लोखंडी पत्रे आवश्यक होते. जानकीबार्इंची कल्पकता कामी आली. संक्रांतीचे हळदी कुंकू घरोघरी स्वतंत्र न करता त्या हळदी कुंकवाचे पैसे एकत्र करून पत्रे खरेदी करावेत, असे आवाहन केले. स्त्रियांनी उत्तम प्रतिसाद दिला. पत्रे खरेदी करून कंपाऊंड उभे केले व १९३६ साली माता बालक मंदिराची स्थापना झाली. मुलांनी सीसॉ, झोके, महिलांसाठी लाठी, लेझीम, रिंग डंबेल्स खरेदी केल्या. महिला-मुलांच्या खेळामुळे मैदान फुलून गेले. संस्थेच्या मदतीसाठी स्त्रियांनी कुलवधू नाटकाचा प्रयोग (स्त्रियांनीच पुरूष पात्रांचे कपडे घालून पुरुष भूमिका केल्या़) जाहीरपणे सरोष टॉकीजमध्ये १९४० साली केला. महिलांची एक पिढी समाजात धीटपणे, मोकळेपणे वावरण्याचे संस्कार या उपक्रमाद्वारे जानकीबार्इंनी दिले. संस्थेची षष्ठ्यब्दी साजरी झाली.
१९३० नंतरच त्या काँग्रेसच्या सभासद झाल्या. १९३६ ला काँग्रेसचे अखिल भारतीय अधिवेशन खान्देशमध्ये (पहिले खेड्यातील अधिवेशन) होणार होते. रावसाहेब पटवर्धन स्वयंसेवक प्रमुख होते. नगरहून १५ महिलांचे पथक घेऊन जानकीबाई गेल्या. १ महिनाभर महिलांना कवायत शिस्तीचे पद्धतशीर ट्रेनिंग दिले. १९३८-३९ मध्ये नगर शहर काँग्रेसच्या अध्यक्ष झाल्या. त्यावेळी त्यांनी अभिनव कल्पना राबवली. स्वत:च्या सहीने पत्रक काढून अभिनव गुढीपाडव्याला प्रत्येक नागरिकाने आपल्या घरावर पारंपरिक गुढीबरोबरच आपल्याला स्वातंत्र्याची गुढी उभारायची आहे हे लक्षात घेऊन तिरंगी झेंडाही उभारावा, असे आवाहन केले. त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला.
१९४१ मध्ये काँग्रेसतर्फे ब्रिटिश सत्तेच्या महायुद्धात भाग घेण्याच्या धोरणाविरुद्ध देशभर वैयक्तिक सत्याग्रह करण्यात आले. त्यात जानकीबार्इंची निवड झाली. जानकीबार्इंनी ६ जानेवारी १९४१ रोजी गांधी मैदानातून प्रचंड मिरवणुकीने युद्ध विरोधी घोषणा शहरभर देत आवेशपूर्ण वातावरण निर्माण केले. त्यांना अटक होऊन तीन महिने कारावासाची शिक्षा झाली. त्यांना येरवडा तुरुंगात पाठवण्यात आले. त्यानंतर १९४२ च्या ‘चले जाव’ चळवळीत त्यांना स्थानबद्ध करण्यात आले. बेळगावच्या जेलमध्ये ठेवण्यात आले. त्यांना जेलमध्ये रक्तदाबाचा तीव्र अटॅक आला. पॅरोलवर तुरुंगातून सशर्त सुटण्यास त्यांनी तेजस्वीपणे नकार दिला. सरकारने धोका न पत्करताना त्यांची बिनशर्त सुटका केली.
१९३८ सालापासून जानकीबाई रोज दुपारी १ ते ३ दिल्ली दरवाजाबाहेरील दलित वस्तीत जात. तेथील लहान मुला-मुलींना जमवून अंघोळ घालणे. स्वच्छतेचे पाठ शिकवू लागल्या. त्याचबरोबर मथुराबाई चांदेकर याही येत. त्यांनी चावडी दुरुस्त करून १ ते ३ इयत्तेपर्यंत शाळा सुरू केली. हरिजन संघाचे थोर कार्यकर्ते ठक्कर बाप्पा यांनी भेट दिली. त्यांनी ग्रामीण भागातील मुली शिकण्यासाठी वसतिगृह असले पाहिजे असा सल्ला दिला. स्वभावानुसार जानकीबार्इंनी ध्यास घेतला व दलित वस्ती शेजारीच देशमुख सावकारांची ६ एकर जागा भाडेपट्ट्याने घेतली व त्यावर वसतिगृहासाठी तीन खोल्या बांधायचे ठरविले. कंत्राटदाराने खोल्या बांधण्याचा एकूण खर्च पाच हजार रूपये सांगितला व तीन हजार रुपये अॅडव्हान्स मागितला. पैशाचा प्रश्न निर्माण झाला. जानकीबार्इंनी राशीन येथील सावकाराकडे धाव घेतली. सावकाराने कर्जापोटी जामीन मागितले. जानकीबार्इंनी स्वत:च्या हातातील सोन्याच्या बांगड्या गहाण ठेवण्याची तयारी दर्शवली व तीन हजारांची पूर्तता केली. इमारत पूर्ण झाली. ११ जून १९४३ रोजी बालिकाश्रमाची स्थापना १४ मुलींसह ११ दलित व ३ सवर्ण अशा संख्येने झाली. एक भव्य स्वप्न साकार झाले. नंतर बालवाडी, प्रा. शाळा, हायस्कूल अशी वाढ झाली.
१९४६ साली बालिकाश्रम उद्योग मंदिर ही महिलांची सहकारी सोसायटी सुरू केली. अनेक महिला कुर्डया, पापड, मसाले तयार करून अर्थार्जन करू लागल्या. घरोघरी हिंडून ३०० महिला सभासद झाल्या. किराणा, कापड विक्रीचे दुकान सुरू केले. १२ वर्षात २२ लाखांचा व्यवहार चोख पद्धतीने केला.
चाकोरीतल्या मध्यमवर्गीय महिला परिषदेपलीकडे जाऊन, झाडूवालीपासून उच्च मध्यमवर्गीय महिलांची २० आॅक्टोबर १९४५ रोजी नगरच्या सिद्धीबाग पटांगणात, भव्य मांडवात बसण्यासाठी फक्त सतरंजी अंथरून तीन हजार महिलांची अभूतपूर्व परिषद झाली. फक्त अध्यक्षांना खुर्ची व परिषद सभासद फी फक्त १ आणा. हा एक समता यज्ञ होता. सर्व जाती धर्माच्या वर्गाच्या स्त्रिया हजर होत्या. मुस्लिम भगिनींनी बुरखा पद्धत बंद करावी, असा ठराव मांडला. अस्पृश्यता बंद करावी, असा ठराव दलित भगिनीने मांडला. यालाच जोडून महिला तयार करत असलेल्या केरसुण्या, खराटे, माठ, चुली, सूप टोपल्या त्याही कला वस्तुंचे प्रदर्शन भरविले. सुबक वस्तुंना बक्षिसेही देण्यात आली.
गांधीजींच्या अकरा कलमी कार्यक्रमात अस्पृश्यता निवारणाबरोबरच हिंदू-मुस्लिम ऐक्य हाही कार्यक्रम होता. जानकीबार्इंनी त्या दिशेने प्रयत्न करण्याचे आव्हान स्वीकारले. त्यादृष्टीने त्यांनी मुस्लिम स्त्रियांशी मैत्री वाढविली. स्त्रियांनी हाताला काम देण्याचे आवाहन केले. जानकीबार्इंनी त्याकाळी प्रचलित असलेले चरखे दिले व सूत कातण्यास शिकवले. सुताच्या गुंडीला ३-४ आणे रोजगार दिला जाई. रोज ५०-६० महिला चरख्यावर सूत कातण्यास जात. रोजगार निर्माण झाला. ऐक्य वाढले. अनेक स्त्रिया जानकीबार्इंच्या सहकारी सोसायटीच्या सभासद झाल्या. द्वेषाच्या वातावरणात ऐक्याचा यशस्वी प्रयत्न अपवादात्मक ठरला.
वेश्या ही महिलाच आहे. तिलाही सन्मान मिळाला पाहिजे असा विचार करून जानकीबार्इंनी धाडसाने लोकवादाची पर्वा न करता नगरच्या वेश्या वस्तीत प्रवेश केला. त्यांच्याशी बातचीत केली. दु:ख-अडचणी जाणून घेतल्या. काही वेश्यांची खणा-नारळाने ओटी भरली.
अशा रितीने एका सामान्य, अशिक्षित महिलेने जातपात-धर्म न मानता, अवघ्या समाजाला एक मानून विविध क्षेत्रात काळाच्या पुढे जाऊन अनंत अडचणींना तोंड देत निर्भयतेने कल्पकतेने सामाजिक कार्याचा महामेरू उभा केला. ते कार्य आजही प्रेरणादायी आहे म्हणून संक्षेपाने मांडले आहे. विशेष म्हणजे नेटका प्रपंच करून त्यांनी परमार्थही केला. जानकीबाई विडी कामगार व झाडू म्युनिसिपल कामगार संघटनेच्या अध्यक्ष होत्या. यशस्वी संप व वाटाघाटी करून त्यांनी सुविधा मिळवून घेतल्या.
लेखक : भालचंद्र आपटे (अध्यक्ष, बालिकाश्रम संस्था)