काष्टीचे सरपंचपद अखेर राहिले रिक्तच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:20 AM2021-04-10T04:20:46+5:302021-04-10T04:20:46+5:30
काष्टी : श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी ग्रामपंचायतीचे सरपंचपद शुक्रवारीही अखेर रिक्तच राहिले. भाजपच्या जयश्री अमोल पवार यांनी उमेदवारी अर्ज भरला. ...
काष्टी : श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी ग्रामपंचायतीचे सरपंचपद शुक्रवारीही अखेर रिक्तच राहिले. भाजपच्या जयश्री अमोल पवार यांनी उमेदवारी अर्ज भरला. मात्र निवडणूक निर्णय अधिकारी विलास आजबे यांनी जात वैधता प्रमाणपत्र नसल्याने जयश्री पवार यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरविला.
येथील सरपंचपदाची जागा ही अनुसूचित जमाती महिला प्रवर्गासाठी राखीव होती. या प्रवर्गातून निवडून आलेल्या जयश्री पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र २०१९ ला जात पडताळणी समितीने जयश्री पवार या महादेव कोळी नसून फक्त कोळी आहेत, असे सांगत जात वैधता प्रमाणपत्रासाठी केलेला अर्ज फेटाळला होता. हा धागा पकडून जालिंदर माणिक पाचपुते, चांगदेव रामदास पाचपुते, नवनाथ राहिंज, सारिका गावडे या चार सदस्यांसह सचिन पाचपुते व सुभाष चौधरी यांनी हरकत घेतली होती.
निवडणूक निर्णय अधिकारी विलास अजबे यांनी जयश्री पवार यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरविला. या सभेस १७ पैकी १३ सदस्य उपस्थित होते. मात्र शीतल माने, जयश्री पवार, सारिका गावडे, मनिषा कोकाटे यांनी सरपंच निवडीच्या बैठकीकडे पाठ फिरविली.
त्या अगोदर आमदार बबनराव पाचपुते यांच्या निवासस्थानी भगवानराव पाचपुते, अनिलराव पाचपुते, उपसरपंच सुनील पाचपुते, वैभव पाचपुते, आबासाहेब कोल्हटकर, ज्ञानदेव पाचपुते, लालासाहेब फाळके यांच्या उपस्थितीत सदस्यांची बैठक झाली.
या बैठकीत सरपंच पदासाठी जयश्री पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. मात्र आपल्या उमेदवारी अर्जावर हरकत घेतली आहे, असे समजताच जयश्री पवार बैठकीस अनुपस्थित राहिल्या.
--
सदस्यपदही धोक्यात..
जयश्री पवार या अनुसूचित जमाती महिला प्रवर्गातून निवडून आलेल्या होत्या. मात्र त्यांना जात वैधता प्रमाणपत्र मिळविता आले नाही. यावर २०१९ ला जात पडताळणी समितीने शिक्कामोर्तब केले आहे. हा प्रकार सरपंचपदाच्या निवडीत पुढे आला. सरपंचपदाच्या प्रयत्नात आता जयश्री पवार यांचे ग्रामपंचायत सदस्य पदही धोक्यात आले आहे.