जिवाच्या भीतीने उपाशीपोटी 100 किमी पायी प्रवास केला, मुलगाही मदतीला नाही आला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2020 11:00 AM2020-03-27T11:00:14+5:302020-03-27T12:52:31+5:30
अकोले तालुक्यातील कातळापूर येथील एका मजुराला करावा लागला. या मजुराला चक्क उपाशीपोटी शंभर किलोमीटर पायी प्रवास करुन घर गाठावे लागले. मुलालाही मोबाईलवर संपर्क केला परंतु त्यानेही प्रतिसाद दिला नाही, अशी खंतही त्याने व्यक्त केली.
मच्छिंद्र देशमुख/
कोतूळ : कोरोनामुळे सर्वत्र लॉक डाऊन स्थिती आहे. अशा स्थितीत परगावी गेलेल्या अनेक मजुरांना संकटाचा सामना करावा लागत आहे. असाच सामना अकोले तालुक्यातील कातळापूर येथील एका मजुराला करावा लागला. या मजुराला चक्क उपाशीपोटी शंभर किलोमीटर पायी प्रवास करुन घर गाठावे लागले. मुलालाही मोबाईलवर संपर्क केला परंतु त्यानेही प्रतिसाद दिला नाही, अशी खंतही त्याने व्यक्त केली.
विठ्ठल देवराम काठे असे या मजुराचे नाव आहे. अकोले तालुक्यातील हजारो आदिवासी बांधव रोजंदारीसाठी पुणे जिल्ह्यातील विविध भागात आहेत. कोरोनाच्या लॉकडाऊन व वाहने बंद आहेत. अफवांमुळे अनेक ठिकाणी रस्त्यावर काट्या, दगडी बांध तर काही गावात नवीन माणसाला हाकलून देत आहेत. या अमानवी कृत्याचा फटका कातळापूर येथील विठ्ठल देवराम काठे यास बसला आहे. तो पारनेर तालुक्यातील पिंपळनेर या ठिकाणी एका शेतकºयांकडे कामासाठी होता. मात्र तेथेही बाहेरचा माणूस गावात थांबू द्यायचा नाही. यामुळे नाईलाजाने विठ्ठलने आपले मजुरीचे पैसे व दोन दिवसांच्या भाकरी शेतकºयाकडून घेतल्या. पारनेरातून एखादी गाडी मिळेल या आशेवर दिवस घातला. पण गावात चिटपाखरूही नसल्याने पारनेर ते कातळापूर हा सव्वाशे किलोमीटर पायी प्रवास करायचे ठरवले. चालताना आडवळणाने अंतर कमी व्हावे म्हणून चालत आलो. परंतु काही ठिकाणी अतिउत्साही स्वयंसेवक गावाच्या हद्दीतून हकलून देत. कुठेतरी शेतातून प्लास्टीकच्या दोन पाण्याच्या बाटल्या भरायच्या व चालत रहावयचे. असा माझा दिनक्रम होता. पहिला मुक्काम बेल्हे गावात पडला. तिथेही विठ्ठल सारखे ठाणे जिल्ह्यातील तीन मजूर होते. बसस्थानकावरून लोकांनी, पोलिसांनी हाकलले. रात्री गावाबाहेरच देवळात रात्र काढली. विठ्ठल कडच्या भाकरी चौघांनी खाल्याने त्या संपल्या. दुसरा मुक्काम ओतूरात झाला.
‘लोकमत’ प्रतिनिधींनी केली मदत
पाडव्याच्या दिवशी दुपारी बारा वाजता विठ्ठल काठे, पिसेवाडी शिवारात आला. एक दिवस व एक रात्र उपाशी असलेल्या विठ्ठलची अवस्था ‘लोकमत’ प्रतिनिधी व पत्रकार संजय फुलसुंदर यांनी पाहिली. त्यांंनी ओळखीच्या पिसेवाडी येथील शेतकरी एकनाथ पारूजी जाधव व मंगल जाधव यांच्या वस्तीवर नेले. सॅनिटाईझरने हातपाय स्वच्छ करून त्यांना पुरणपोळीचे सणाचे जेवण दिले . ‘लोकमत’ने त्यांचे राजूरपर्यंत प्रवासाचे अडथळे दूर केले.
एरवी आदिवासींच्या भल्याचे खोटे अश्रू वाहणारे निवडणूक काळात कडक बंदोबस्त असताना एका रात्रीत या लोकांना मतासाठी घेऊन येतात. निवडूनही येतात. मात्र असे असंख्य मजूर गेली तीन दिवस जीवाच्या आकांताने गावाकडे येताहेत. आता हे नेते झोपलेत का ? असा प्रश्न विठ्ठलने केल्याने वास्तव समोर आले.
मुलगाही मदतीला आला नाही
विठ्ठल काठे यांचा मुलगा बारावी झालेला आहे. त्याच्याकडे दुचाकीही आहे. विठ्ठलने तीन दिवसांपूर्वी फोन करून गाडी घेऊन ये असे सांगितले. मात्र मुलगाही मदतीला आला नाही. विठ्ठलने अनेकांच्या फोनवरू संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र मुलाने फोन बीझी टोनवर ठेवला आहे. ‘लोकमत’ प्रतिनिधीनेही देखील दोन तास संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र उत्तर आले नाही. शेवटी विठ्ठलने त्याच्या अश्रुंची वाट मोकळी केली.