केडगाव दुहेरी हत्याकांड : राष्ट्रवादीच्या दोन आमदारांना खोट्या गुन्ह्यात अडकविले - वळसे यांची टीका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2018 03:03 PM2018-04-09T15:03:36+5:302018-04-09T15:04:52+5:30
केडगाव दुहेरी हत्याकांडातील आरोपी स्वत:हून पोलीस ठाण्यात हजर झाला आहे़ त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून, त्याने हे कृत्य का केले ते पोलिसांना सांगितलेही आहे. तरीही शिवसेनेने सत्तेचा वापर करुन राष्ट्रवादीच्या दोन आमदारांना या प्रकरणात अडकविले आहे, असे राष्ट्रवादीचे नेते व विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसेपाटील यांनी सांगितले.
अहमदनगर : केडगाव दुहेरी हत्याकांडातील आरोपी स्वत:हून पोलीस ठाण्यात हजर झाला आहे. त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून, त्याने हे कृत्य का केले ते पोलिसांना सांगितलेही आहे. तरीही शिवसेनेने सत्तेचा वापर करुन राष्ट्रवादीच्या दोन आमदारांना या प्रकरणात अडकविले आहे, असे राष्ट्रवादीचे नेते व विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसेपाटील यांनी सांगितले.
राष्ट्रवादी भवनमध्ये वळसेपाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला़ ते म्हणाले, ज्या आरोपीने हे कृत्य केले आहे, त्याचा राष्ट्रवादीशी काहीही संबंध नाही़ तो पक्षाचा सदस्य नाही. या घटनेच्या चौकशीसाठी आमदार संग्राम जगताप यांना पोलीस ठाण्यात बोलावले असता तेथे तरुणांची मोठी गर्दी झाली होती. तेथे ज्या तरुणाने पोलीस ठाण्याची काच फोडली त्याचा पोलिसांनी शोध घेतला पाहिजे. पण तसे न करता राष्ट्रवादीच्या नेत्यांवर व कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. केडगाव हत्याकांडाशीही राष्ट्रवादीचा काहीही संबंध नसताना या प्रकरणात राष्ट्रवादीच्या दोन आमदारांना गोवण्याचा प्रयत्न केला आहे. यात राजकीय षढयंत्र आहे. विधानसभा निवडणुका जवळ आल्या आहेत. आमदार संग्राम जगताप यांच्या लोकप्रियतेची धास्ती त्यांनी घेतली आहेत. त्यामुळे त्यांनी हे आरोप लावले आहेत़ राष्ट्रवादीच्या आमदारांना असे खोट्या गुन्ह्यात अडकविले जात आहे, हे खपवून घेतले जाणार नाही. शिवसेनेने आरोप सिद्धध करावेत अन्यथा कारवाईला तयार रहावे. या प्रकरणी अजित पवार, सुनील तटकरे, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे असे आम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहोत, असेही वळसे यांनी सांगितले. यावेळी आमदार राहूल जगताप, आमदार वैभव पिचड, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले, माणिकराव विधाते, सुजित झावरे आदी उपस्थित होते.
..... तरीही कळमकरांवर गुन्हा
घटनेनंतर पोलिसांनी आमदार संग्राम जगताप यांना चौकशीसाठी बोलावले होते़ त्यावेळी तेथे तोडफोड कोणी केली, याचा पोलिसांनी शोध घ्यावा़ एका पोलिसाच्या फिर्यादीवरुन निरापराधांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दादाभाऊ कळमकर यांच्या डोळ्याचे आॅपरेशन झाले आहे. त्यामुळे ते पोलीस ठाण्यात गेलेही नव्हते तरीही त्यांचेही या नाव या गुन्ह्यात ओवण्यात आले आहे. अशा पद्धतीने राष्ट्रवादीच्या नेत्यांवर खोटे गुन्हे दाखल करण्याचे काम सुरु आहे.