केडगाव दुहेरी हत्याकांड निषेधार्थ जिल्हाभर बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2018 01:23 PM2018-04-08T13:23:08+5:302018-04-08T13:25:50+5:30
केडगावमधील शिवसेना कार्यकर्त्यांच्या दुहेरी हत्याकांडाच्या निषेधार्थ शिवसेनेने जिल्हाभर बंदची हाक दिली आहे. शहरात वातावरण तणावपूर्ण असून केडगाव, श्रीगोंदा, अकोले, जामखेड, नेवासा येथे कडकडीत बंद पाळण्यात येत आहे.
अहमदनगर : केडगावमधील शिवसेना कार्यकर्त्यांच्या दुहेरी हत्याकांडाच्या निषेधार्थ शिवसेनेने जिल्हाभर बंदची हाक दिली आहे. शहरात वातावरण तणावपूर्ण असून केडगाव, श्रीगोंदा, अकोले, जामखेड, नेवासा येथे कडकडीत बंद पाळण्यात येत आहे.
केडगाव येथे घडलेल्या या घटनेचा नगर शहर शिवसेनेच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. यावेळी त्यांनी घटनेचा निषेध केला. या मोर्चामध्ये शिवसेना नेते अनिल राठोड, जिल्हाध्यक्ष शशिकांत गाडे, माजी महापौर भगवान फुलसौंदर यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते सामील झाले होते. शेवगाव तालुका शिवसेनेच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला. हत्याकांडाच्या या घटनेची सखोल चौकशी करण्यात यावी, सर्व आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी. हा खटला जलद गती न्यायालयात चालविण्यात यावा अशी मागणीचे निवेदन शेवगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक गोविंद ओमासे यांना देण्यात आले. मोर्चामध्ये शिवसेना तालुका प्रमुख भारत होकारे, जेष्ठ नेते अॅड अविनाश मगरे, माजी तालुका प्रमुख एकनाथ कुसळकर, शहर प्रमुख सुनील जगताप, युवा सेना तालुका प्रमुख शीतल पुरनाळे सहभागी झाले होते. शिवसैनिकांनी पाथर्डीत रास्ता रोको करण्यास आले. नेवाशात रविवारी आठवडा बाजार असल्याने सोमवारी बंद पाळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
शिवसेनेचे नगरशहर उपप्रमुख संजय कोतकर, सेना कार्यकर्ते वसंत ठुबे यांची भर चौकात गोळ्या झाडून व कोयत्याने वार करण्यात आली. याप्रकरणी आमदार संग्राम जगताप यांच्यासह चौघांना अटक करण्यात आली आहे.