केडगाव हत्याकांड : सीआयडी तपास, भानुदास कोतकरचा हात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2018 07:54 PM2018-06-08T19:54:38+5:302018-06-08T19:54:46+5:30
केडगाव दुहेरी हत्याकांडात भानुदास कोतकर याचा सहभाग असल्याचे सीआयडी तपासातही समोर आले आहे. कोतकरच्या जामीन अर्जासंदर्भात जिल्हा न्यायालयाने सरकारी पक्षाला म्हणने सादर करण्याचे आदेश दिले होते. शुक्रवारी या संदर्भात अहवाल देण्यात आला असून, यामध्ये हत्याकांडात कोतकरचा सहभाग असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
अहमदनगर: केडगाव दुहेरी हत्याकांडात भानुदास कोतकर याचा सहभाग असल्याचे सीआयडी तपासातही समोर आले आहे. कोतकरच्या जामीन अर्जासंदर्भात जिल्हा न्यायालयाने सरकारी पक्षाला म्हणने सादर करण्याचे आदेश दिले होते. शुक्रवारी या संदर्भात अहवाल देण्यात आला असून, यामध्ये हत्याकांडात कोतकरचा सहभाग असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान कोतकर याच्या जामीन अर्जावर १३ जून रोजी सुनावणी होणार आहे. केडगाव येथे ७ एप्रिल रोजी शिवसेनेचे शहर उपप्रमुख संजय कोतकर व वसंत ठुबे यांची गोळ्या घालून हत्या झाली. या प्रकरणी पोलीसांनी आमदार संग्राम जगताप, भानुदास कोतकर याच्यासह दहा जणांना अटक केली आहे. न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर कोतकर याने जिल्हा न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला आहे. या अर्जावर न्यायालयाने सरकारी पक्षाला म्हणने सादर करण्याचे आदेश दिले होते. शुक्रवारी सीआयडीने न्यायालयात म्हणने सादर केले आहे.
कोतकर हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून, त्याच्यावर याआधी अनेक गुन्हे दाखल आहेत. खुनाच्या गुन्ह्यात त्याला शिक्षा झालेली आहे. त्याच्याकडे पैसे आणि ताकद आहे़ केडगाव हत्याकांड हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा असून याबाबत तपास सुरू आहे. त्यामुळे कोतकर याला जामीन देऊ नये असे म्हणने सादर करण्यात आले आहे. दरम्यान सरकारी पक्षाने शुक्रवारी म्हणने सादर केल्याने यावर अभ्यास करण्यासाठी न्यायालयाने आरोपीपक्षाला वेळ दिला असून, १३ जून रोजी जामीन अर्जावर सुनावणी ठेवण्यात आली आहे.
सुवर्णा कोतकरची चौकशी होणार का ?
शिवसैनिकांचे हत्याकांड होण्याच्या काही तास आधी केडगाव येथे सुवर्णा कोतकर व विशाल कोतकर यांची एक बैठक झाली होती. या बैठकीतून सुवर्णा कोतकर यांनी त्यांचा सासरा भानुदास कोतकर फोन केला होता. ही बाब विशेष पथकाच्या तपासात समोर आली होती. विशेष पथकाने मात्र सुवर्णा कोतकर यांची चौकशी केली नव्हती. सीआयडी या प्रकरणात सुवर्णा यांची चौकशी करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.