केडगाव पोलीस ठाण्याचा प्रस्ताव धूळखात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2018 02:34 PM2018-12-18T14:34:16+5:302018-12-18T14:34:18+5:30
नगर शहराचे सर्वात मोठे उपनगर म्हणून केडगाव ओळखले जाते़
अहमदनगर : नगर शहराचे सर्वात मोठे उपनगर म्हणून केडगाव ओळखले जाते़ विस्तारणाऱ्या नागरीकरणासह गेल्या काही वर्षांत येथील गुन्हेगारीनेही डोके वर काढले आहे़ गेल्या नऊ महिन्यात या ठिकाणी चार खून झाले़ रस्तालूट, घरफोड्या, मारहाण आदी घटना तर सतत सुरू आहेत़ केडगावात स्वतंत्र पोलीस ठाणे निर्माण झाले तर काही प्रमाणात येथील गुन्हेगारीला आळा बसणार आहे़ येथील पोलीस ठाण्याचा प्रस्ताव मात्र गेल्या अठरा वर्षांपासून प्रलंबित आहे़
केडगाव येथे ७ एप्रिल रोजी राजकीय वादातून घडलेल्या दुहेरी हत्याकांडामुळे येथील पोलीस ठाण्याचा विषय पुन्हा चर्चेत आला़ यावर मात्र स्थानिक लोकप्रतिनिधींकडून काहीच पाठपुरावा न झाल्याने या प्रस्तावावर अंमलबजावणी झाली नाही़ गेल्या पंधरा दिवसात या ठिकाणी खुनाच्या दोन घटना घडल्या़ वाढती लोकसंख्या, राजकीय हेवेदावे, येथून जाणारा महामार्ग, बाह्यवळण रस्ता आणि विस्तारणाºया झोपडपट्ट्या आदी कारणांमुळे येथील गुन्हेगारीचा रेषो वाढत आहे़ या ठिकाणी स्वतंत्र पोलीस ठाणे व्हावे, यासाठी अठरा वर्षांपूर्वी तत्कालीन पोलीस अधीक्षकांनी शासनाकडे प्रस्ताव पाठविलेला आहे़ केडगाव उपनगर कोतवाली पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येते़ केडगाव हे शहरापासून पाच किलोमीटर दूर असल्याने या ठिकाणी काही घटना घडल्यास तेथे पोलीस पोहचण्यासही विलंब होतो़ केडगाव येथे पोलीस चौकी असून येथे चार ते पाच पोलीस कर्मचाºयांची नियुक्ती आहे़ इतक्या कमी मनुष्यबळात केडगाव येथील कायदा आणि सुव्यवस्था राखणे अवघड होते़
राजकारणातील गुन्हेगारी पॅटर्न
केडगाव येथील राजकारणातील गुन्हेगारी पॅटर्न सर्वश्रुत आहे़ एकेकाळी कोतकर घराण्याचा येथे मोठा दबदबा होता़ गेल्या काही वर्षांत मात्र अनेक जण राजकारणात सक्रिय झाले असून, यातून हेवेदावे वाढून भर रस्त्यावर हाणामारीच्या घटना घडत आहेत़ त्यामुळे येथील वातावरण असुरक्षित बनले आहे़
या ठाण्यांचे प्रस्ताव प्रलंबित
शासन दरबारी गेल्या आठ ते दहा वर्षांपासून बोधेगाव (शेवगाव), तिसगाव (पाथर्डी), देवळालीप्रवरा (राहुरी), राशीन (कर्जत), केडगाव, सावेडी उपनगर आदी प्रस्ताव प्रलंबित आहेत.
जिल्ह्यातील ज्या तालुक्यात एक पोलीस ठाणे आहे तेथे दोन पोलीस ठाणे होण्याबाबत शासनाकडे प्रस्ताव पाठविलेले आहेत़ याबाबत पाठपुरावा सुरू आहे़ येत्या काही दिवसात देवळालीप्रवरा व केडगाव पोलीस ठाण्याला मंजुरी मिळणार आहे़
- अरूण जगताप, पोलीस उपाधीक्षक (गृह)