केडगाव शिवसैनिकांच्या हत्येशी राजकीय नेत्यांचा संबंध नाही- विशाल कोतकरची पोलिसांना माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2018 01:13 PM2018-04-25T13:13:10+5:302018-04-25T13:16:26+5:30

रवी खोल्लमच्या कुटुंबाला संरक्षण देण्यासाठी पाठविलेल्या संदीप गुंजाळ यानेच परस्पर दोघा शिवसैनिकांची हत्या केली. या घटनेशी कोणत्याही राजकीय नेत्यांचा संबंध नाही, अशी माहिती केडगाव दुहेरी हत्याकांडाचा केंद्रबिंदू ठरलेल्या नगरसेवक विशाल कोतकर याने पोलिसांना दिली.

Kedgaon Shivsainik's involvement is not related to political leaders - Information about Vishal Kotkar police | केडगाव शिवसैनिकांच्या हत्येशी राजकीय नेत्यांचा संबंध नाही- विशाल कोतकरची पोलिसांना माहिती

केडगाव शिवसैनिकांच्या हत्येशी राजकीय नेत्यांचा संबंध नाही- विशाल कोतकरची पोलिसांना माहिती

अहमदनगर : रवी खोल्लमच्या कुटुंबाला संरक्षण देण्यासाठी पाठविलेल्या संदीप गुंजाळ यानेच परस्पर दोघा शिवसैनिकांची हत्या केली. या घटनेशी कोणत्याही राजकीय नेत्यांचा संबंध नाही, अशी माहिती केडगाव दुहेरी हत्याकांडाचा केंद्रबिंदू ठरलेल्या नगरसेवक विशाल कोतकर याने पोलिसांना दिली.
कोतकर याला विशेष पथकाने मंगळवारी पहाटे कामरगाव (ता. नगर) परिसरातून अटक केली. दुपारी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला २७ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. रवी खोल्लम याची पोलीस कोठडी मंगळवारी संपत होती. त्यामुळे त्यालाही न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यालाही २७ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. एस. पाटील यांनी दिला आहे.
केडगाव येथे ७ एप्रिल रोजी सेनेचे शहर उपप्रमुख संजय कोतकर व वसंत ठुबे यांची संदीप गुंजाळ याने हत्या केली. या घटनेनंतर गुंजाळ पोलिसांत हजर झाला. विशाल कोतकर फरार होता. या हत्याकांडाचा सूत्रधार म्हणून विशाल याचे नाव समोर आले. एलसीबीची टीम त्याचा शोध घेत होती. अखेर त्याला अटक झाली. पोलिसांनी पकडताच विशाल याने हत्याकांडाचा घटनाक्रम सांगितला. ७ एप्रिल रोजी संजय कोतकर व रवी खोल्लम यांच्यामध्ये फोनवरून बोलताना वाद झाला होता. खोल्लम याने ही बाब विशाल कोतकरला सांगितली होती. त्यामुळे विशाल कोतकरने गुंजाळ याला खोल्लमच्या घरी प्रकरण मिटविण्यासाठी पाठविले. त्यावेळी खोल्लमच्या घरी गुंजाळ याची संजय कोतकर, वसंत ठुबे यांची भेट झाली़ तेथे संजय कोतकर आणि गुंजाळ यांच्यात वाद झाला. राग अनावर झाल्याने गुंजाळ याने स्वत:कडील गावठी कट्ट्यातून कोतकर आणि ठुबे यांना गोळ्या झाडून व गुप्तीने वार करून मारले. कोतकर व ठुबे यांना मार, असे मी अथवा इतर कोणीही गुंजाळ याला सांगितले नव्हते, अशी माहिती विशाल कोतकर याने पोलिसांना दिली आहे. विशाल कोतकर याने दिलेल्या जबाबातील माहिती पडताळून पाहण्यात येत आहे.

हत्याकांडापूर्वी भानुदास कोतकरच्या घरी बैठक

संजय कोतकर याने रवी खोल्लम याला फोन करून शिवीगाळ केल्याची बाब विशाल कोतकर याला सांगितली. विशाल कोतकर खोल्लमला घेऊन केडगाव येथील भानुदास कोतकर याच्या घरी गेला. तेव्हा भानुदास कोतकर तेथे नव्हता़ भानुदास कोतकर याची सून सुवर्णा यांनी भानुदास कोतकर याला फोन केला. त्यांच्या घरात झालेल्या बैठकीत नेमके काय घडले. याचा शोध पोलीस घेत आहेत, असे सरकारी पक्षाच्यावतीने न्यायालयात सांगण्यात आले. दरम्यान हत्याकांड घडल्यानंतर पोलिसांनी भानुदास कोतकर याच्या घराच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. मात्र फुटेजचे डीव्हीआर गायब झाले आहेत, असे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांकडून ८० जणांची चौकशी

केडगाव हत्याकांडातील संशयित आरोपींच्या संपर्कात आलेल्या ८० जणांची विशेष पथकाने आतापर्यंत चौकशी केली आहे़ यातील विशाल कोतकर, रवी खोल्लम, संदीप गुंजाळ यांना फोन करणाऱ्यांची चौकशी सुरू आहे.

या नऊ जणांना अटक

केडगाव दुहेरी हत्याकांडप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत आमदार संग्राम जगताप, संदीप गुंजाळ, बाळासाहेब कोतकर, भानुदास ऊर्फ बी. एम. कोतकर, रवी खोल्लम, संदीप गि-हे, महावीर मोकळे, बाबासाहेब केदार, विशाल कोतकर अशा ९ जणांना अटक केली आहे.

 

Web Title: Kedgaon Shivsainik's involvement is not related to political leaders - Information about Vishal Kotkar police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.