केडगावात लसीकरणावरून आजी-माजी नगरसेवकांमध्ये खडाजंगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:18 AM2021-05-30T04:18:14+5:302021-05-30T04:18:14+5:30
केडगाव : केडगाव आरोग्य केंद्रात चालणारे लसीकरण महापालिकेच्या भाग्योदय मंगल कार्यालयात नेण्याच्या निर्णयाला केडगावमधील शिवसेनेच्या नगरसेवकांनी जोरदार विरोध दर्शविला. ...
केडगाव : केडगाव आरोग्य केंद्रात चालणारे लसीकरण महापालिकेच्या भाग्योदय मंगल कार्यालयात नेण्याच्या निर्णयाला केडगावमधील शिवसेनेच्या नगरसेवकांनी जोरदार विरोध दर्शविला. यावरून केडगावमधील आजी-माजी नगरसेवकांमध्ये आरोग्य केंद्रातच खडाजंगी झाली. शनिवारी सकाळी हा प्रकार घडला.
केडगावमधील नागरिकांसाठी महापालिकेच्या आयुक्तांनी एकनाथनगर येथील भाग्योदय मंगल कार्यालयात व नगर-पुणे मार्गावरील निशा लॉन येथे लसीकरण केंद्रास मंजुरी दिली. याबाबत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मागणी केली होती. सध्या पावसाळा तोंडावर आल्याने केडगाव आरोग्य केंद्रात नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी या दोन्ही केंद्राना मंजुरी दिल्याचे यावेळी सांगण्यात आले. सर्वसामान्य नागरिक याबाबत अनभिज्ञ होते. त्यांनी शनिवारी सकाळपासूनच आरोग्य केंद्रात रांगा लावल्या होत्या. मात्र आरोग्य केंद्राच्या वतीने नागरिकांना भाग्योदय मंगल कार्यालय येथे जाण्यास सांगण्यात आले. तेथे लसीकरणही बंद करण्यात आले. हे समजताच शिवसेनेचे नगरसेवक अमोल येवले, विजय पठारे, संग्राम कोतकर यांनी आरोग्य केंद्र गाठले. भाग्योदय कार्यालय येथून लांब असून येथील नागरिकांना ते गैरसोयीचे आहे. त्याऐवजी अंबिकानगर येथील कार्यालय किंवा भूषणनगर येथील कार्यालयात लसीकरण सुरू करण्याची मागणी त्यांनी केली.
कॉंग्रेसचे माजी नगरसेवक सुनील कोतकर यांनी केडगाव आरोग्य केंद्रातच लसीकरण सुरू ठेवावे इतर ठिकाणी ठेऊ नये, अशी मागणी केली. यावेळी राष्ट्रवादीचे गणेश सातपुते, भरत गारुडकर, भूषण गुंड आदी कार्यकर्ते तेथे जमा झाले. लसीकरण केंद्रावरून त्यांच्यातच शाब्दिक खडाजंगी सुरू झाली. शेवटी पोलिसांनी मध्यस्थी करीत राजकीय पदाधिकाऱ्यांना केंद्रातून दूर केले.
---
भाग्योदय कार्यालय लसीकरणासाठी गैरसोयीचे आहे. लोक इतक्या लांब कशा चकरा मारणार. त्याऐवजी अंबिकानगर किंवा भूषणनगर कार्यालय सोयीचे आहे. जेवढे लसीकरण व्हायला पाहिजे तेवढे होत नाही. लस पुरवठ्यात राजकारण केले जाते. केडगावकरांची येथेही अडवणूक होत आहे. चुकीचा निर्णय घेतला तर आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल.
-दिलीप सातपुते,
शहर प्रमुख, शिवसेना
---
भाग्योदय व निशा लॉन येथे लसीकरणासाठी आयुक्तांनी मंजुरी दिली. मात्र केडगाव केंद्रात सुरू असलेले लसीकरण आम्ही बंद करू देणार नाही. येथील नागरिकांनी कोठे जायचे.
-सुनील कोतकर,
माजी नगरसेवक, कॉंग्रेस