केडगाव तोडफोड : अकरा शिवसैनिकांना जामीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2018 07:58 PM2018-05-29T19:58:16+5:302018-05-29T19:59:02+5:30
केडगाव तोडफोड प्रकरणी दाखल गुन्ह्यात शिवसेनेचे माजी शहर प्रमुख संभाजी कदम यांच्यासह अकरा शिवसैनिक मंगळवारी कोतवाली पोलीस ठाण्यात हजर झाले. जिल्हा न्यायालयाने या अकरा जणांना जामीन मंजूर केला आहे.
अहमदनगर: केडगाव तोडफोड प्रकरणी दाखल गुन्ह्यात शिवसेनेचे माजी शहर प्रमुख संभाजी कदम यांच्यासह अकरा शिवसैनिक मंगळवारी कोतवाली पोलीस ठाण्यात हजर झाले. जिल्हा न्यायालयाने या अकरा जणांना जामीन मंजूर केला आहे.
केडगाव येथे ७ एप्रिल रोजी सेनेचे शहर उपप्रमुख संजय कोतकर व वसंत ठुबे यांची हत्या झाली. यावेळी घटनास्थळी संतप्त जमावाने तोडफोड केली होती. याप्रकरणी सेनेचे माजी आमदार अनिल राठोड यांच्यासह ६०० जणांवर गुन्हा कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्यात या आधी पोलीसांनी ३२ शिवसैनिकांना अटक केली असून, त्यांना जामीन मंजूर झाला आहे. मंगळवारी संभाजी कदम यांच्यासह विशाल वालकर, प्रशांत गायकवाड, सागर थोरात, अभिषेक भोसले, अदिनाथ राजू उर्फ लक्ष्मण जाधव, तेजस गुंदेचा, बंटी उर्फ कुणाल खैरे, उमेश काळे, सचिन शिंदे, सेनेच्या महिला आघाडीच्या पदाधिकारी अशा निंबाळकर हे 11 जण कोतवाली पोलीसांना शरण आले़
दुपारी तीन वाजता प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस.एस.पाटील यांच्या न्यायालयात आरोपींना हजर करण्यात आले होते. यावेळी सरकारी पक्षाच्यावतीने गुन्ह्याचा तपास करावयाचा असल्याने आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडीची मागणी केली. यावर आरोपी पक्षाच्यावतीने अॅड. राहुल पवार यांनी युक्तीवाद करत या गुन्ह्याचा तपास पूर्ण झाला असल्याने आरोपींना जामीन द्यावा अशी माणगी केली. न्यायालयाने दोन्ही बाजुने म्हणने ऐकून घेतल्यानंतर सर्वांना न्यायालयीन कोठडी दिली. त्यानंतर आरोपीच्यावतीने जामीनासाठी अर्ज केल्यानंतर सर्वांना जमीन मंजूर झाला. जामीन मंजूर झालेल्यांना दर शनिवारी दुपारी कोतवाली पोलीस ठाण्यात हजेरी द्यावी लागणार आहे.
राठोड हजर होणार की, पोलीस पकडणार
केडगाव तोडफोडप्रकरणी माजी आमदार अनिल राठोड यांच्यावरही गुन्हा दाखल आहे. गेल्या महिनाभरात पोलीसांनी या गुन्ह्यातील ४३ जणांना अटक केली. यातील बहुतांशी जण स्वत:हून पोलीसांत हजर झाले. राठोड मात्र हे अद्यापपर्यंत पोलीसांत हजर झालेले नाही. त्यामुळे पोलीस त्यांना कधी अटक करणार असा प्रश्न आहे.