केडगावकरांची काेरोनाच्या दुसऱ्या डोससाठी नगरमध्ये वणवण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:20 AM2021-05-08T04:20:56+5:302021-05-08T04:20:56+5:30
केडगाव : केडगाव आरोग्य केंद्रात सध्या १८ ते ४४ वयोगटासाठी लसीकरण प्रक्रिया सुरू आहे. नोंदणीकृत झालेल्यांना पहिला डोस दिला ...
केडगाव : केडगाव आरोग्य केंद्रात सध्या १८ ते ४४ वयोगटासाठी लसीकरण प्रक्रिया सुरू आहे. नोंदणीकृत झालेल्यांना पहिला डोस दिला जातो. मात्र दुसरा डोस देणे केडगाव केंद्रात बंद केले आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना दुसऱ्या डोससाठी नगरच्या केंद्रावर वणवण करण्याची वेळ आली आहे.
केडगाव आरोग्य केंद्रात दररोज सरासरी तीनशे जणांचे लसीकरण केले जात आहे. १ मे पासून १८ वर्ष ते ४४ वयोगटातील नागरिकांना पहिला डोस दिला जात आहे. यामुळे आता यापूर्वी ज्यांनी केडगाव केंद्रात पहिला डोस घेतला आहे, त्यांना आता दुसरा डोस येथील केंद्रात देण्याचे बंद केले आहे. केडगावमध्ये ज्यांना दुसरा डोस घ्यायचा आहे, त्यांना आता तोफखाना आरोग्य केंद्र व सावेडी आरोग्य केंद्रात पाठवले जात आहे. यामुळे लॉकडाऊन असूनही नागरिकांना नगरमध्ये जाऊन दुसऱ्या डोससाठी वणवण फिरावे लागत आहे. त्यात वय ४५ च्या पुढच्यांना ही लस मिळत नसल्याच्या तक्रारी येत आहेत.
सावेडी व तोफखाना येथे गर्दी असल्याने केडगावमधील नागरिकांना अनेकदा तेथे चकरा मारण्याची वेळ आली आहे. महापालिकेच्या अयोग्य नियोजनामुळे नागरिकांना उन्हातान्हात नाहक फिरण्याची वेळ आली आहे.
तसेच ज्यांची नोंदणी व लसीचे शेड्यूल आले आहे, त्यांनाच लस देण्यात येत आहे. मात्र नोंदणीत अनेक तांत्रिक अडचणी येत आहेत. काहींची नोंदणी करताना साईट बंद होते, तर काहींची नोंदणी होऊनही लस घेण्याची दिनांक मिळत नाही. यामुळे अनेक जण नोंदणीला वैतागले आहेत.
--
दुसरा डोस दुपारी तीन ते पाच या वेळेत मिळावा
जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार दुचाकीवर डबल सीट परवानगी नसल्याकारणाने व कोरोना लसीकरण केंद्र केडगावपासून दूर अंतरावर असल्याने अनेक ज्येष्ठ नागरिकांचा कोरोना लसीकरणाचा दुसरा डोस हा चुकत आहे. काहींच्या दुसरा डोस घेण्याच्या तारखा उलटून गेलेल्या आहेत. तरी १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण हे सकाळी दहा ते तीन या वेळेत घेऊन दुपारनंतरची वेळ तीन ते पाचमध्ये उन्हाचा कहर कमी झाल्यानंतर ज्येष्ठांना प्रत्येक केंद्रावर दुसरा डोस मिळावा, अशा मागणीचे निवेदन केडगाव जागरूक नागरिक मंचने दिले आहे.
---
कोरोना तपासणी केंद्र आता स्वतंत्र ठिकाणी
केडगाव आरोग्य केंद्रात लसीकरण व कोरोना तपासणी एकाच ठिकाणी होत होती . यामुळे दोन्ही कारणासाठी केडगाव केंद्रात मोठी गर्दी होत होती. यामुळे कोरोना संक्रमणाचा धोका अधिकच वाढला होता. मात्र आरोग्य अधिकारी गिरीश दळवी यांनी केडगावच्या केंद्र शाळेत आता कोरोना तपासणीचे केंद्र हलवले आहे.
--
केडगाव आरोग्य केंद्रात वय ४५ च्या पुढील नागरिकांना दुसरा डोस मिळावा यासाठी आयुक्तांची भेट घेतली. सध्या दुसऱ्या डोससाठी केडगावमधील वयोवृद्ध नागरिकांना नगरच्या केंद्रावर पाठवले जात आहे. तेथे त्यांचे आतोनात हाल होऊनही त्यांना लस मिळत नाही. दोन दिवसातच केडगावला दुसरा डोस सुरू करण्याचे आश्वासन दिले आहे.
-अमोल येवले,
नगरसेवक, केडगाव
---
०७ केडगाव निवेदन
केडगावमध्ये आरोग्य केंद्रात दुसरा डोस सुरू करावा, यासाठी नगरसेवक अमोल येवले, विठ्ठल कोतकर, अजित कातोरे यांनी आयुक्तांना निवेदन दिले.