शिवसैनिक हत्याकांड प्रकरणी एक संशयित पोलिसांच्या ताब्यात, मारेकऱ्यांना शस्त्र पुरवल्याचा अंदाज
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2018 09:12 AM2018-04-11T09:12:37+5:302018-04-11T09:17:03+5:30
अहमदनगरमधील शिवसेनेचे शहर उपप्रमुख संजय कोतकर व कार्यकर्ता वसंत ठुबे हत्याकांड प्रकरणावरुन पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.
अहमदनगर - अहमदनगरमधील शिवसेनेचे शहर उपप्रमुख संजय कोतकर व कार्यकर्ता वसंत ठुबे हत्याकांड प्रकरणावरुन पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. या संशयितानं मारेकऱ्यांना शस्त्र पुरवल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. यापूर्वी याप्रकरणी भाजपा आमदार शिवाजी कर्डिले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांच्यासह चौघांना अटक करण्यात आली आहे
भर चौकात शिवसैनिकांची निर्घृण हत्या
शनिवारी (7 एप्रिल) संध्याकाळी 6 वाजण्याच्या सुमारास केडगाव येथील सुवर्णनगर येथे भर चौकात संजय कोतकर व वसंत ठुबे यांची हत्या करण्यात आली. संजय कोतकर व वसंत ठुबे हे दोघे केडगाव येथील सुवर्णनगर परिसरात एकत्र होते. याचवेळी हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला. या घटनेनंतर संतप्त शिवसैनिकांनी सुवर्णनगर येथे दगडफेक करत वाहनांची तोडफोड केली होती. घटनास्थळी पोलीस दाखल झाल्यानंतर संतप्त जमावाने पोलीस वाहनांवरही दगडफेक केली.
दरम्यान, पोलीस अधीक्षक कार्यालयात धुडगूस घालून तोडफोड केल्याप्रकरणी आमदार शिवाजी कर्डिले, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष दादाभाऊ कळमकर, नगरसेवक कैलास गिरवले, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सचिन अरुण जगताप, नगरसेवक कुमार वाकळे, माजी नगरसेवक निखील वारे, अभिजित कळमकर, बाबासाहेब गाडळकर, राष्ट्रवादी युवकचे शहर जिल्हाध्यक्ष अभिजित खोसे यांच्यासह अडीचशे ते तीनशे कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी 22 कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली आहे.