शेतकरी हितासाठी भाजपला दूर ठेवा-अजित नवले; किरण लहामटेंच्या प्रचारार्थ सभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2019 01:26 PM2019-10-16T13:26:18+5:302019-10-16T13:28:17+5:30
शेतकरी वाचवायचा असेल तर या निवडणुकीत कुठल्याही परिस्थितीत भाजपला मतदान करु नका, अशी टीका शेतकरी नेते कॉ. अजित नवले यांनी लिंगदेव येथील सभेत केली.
अकोले : शेतकरी वाचवायचा असेल तर या निवडणुकीत कुठल्याही परिस्थितीत भाजपला मतदान करु नका, अशी टीका शेतकरी नेते कॉ. अजित नवले यांनी लिंगदेव येथील सभेत केली.
राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ. किरण लहामटे यांचे प्रचारार्थ मंगळवारी लिंगदेव येथे झालेल्या प्रचार सभेत ते बोलत होते. ते म्हणाले, मोदी सरकारने भूलथापा देऊन शेतक-यांचे जगणे मुश्किल केले आहे. बेरोजगारी वाढली आहे. कालपर्यंत अकोलेवर त्यांच्यावर टीका करत होते. आज तेच त्यांची आरती ओवाळू लागले आहेत. शेतक-यांची हत्या करणा-या या सर्वांना सत्तेपासून दूर ठेवा.
भागाजी फापाळे यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. डॉ. लहामटे म्हणाले, मतदार संघात विकास पाहिजे असेल तर दूरदृष्टीचा नेता असायला पाहिजे. मला एक संधी दिल्यास शिक्षण, आरोग्य, पाणी यांसह मूलभूत समस्या सोडवेल.
दुपारी डॉ. लहामटे यांनी आढळा खो-यातील विश्रामगड परिसरातील गावांमध्ये प्रचारदौरा केला. खिरविरे येथेही सभा झाली. अशोक भांगरे, यमाजी लहामटे, सुनीता भांगरे, विनोद हांडे, मारुती मेंगाळ यांनी शेरणखेल येथे डॉ. लहामटे यांच्या प्रचारार्थ मंगळवारी सकाळी सभा घेतली. पिंपळगाव नाकविंदा, पिंपरकणे, मान्हेरे, आंबेवंगण, वारंघुशी भागात प्रचार केला.
बारामतीसारखा विकास व्हावा
विनय सावंत म्हणाले, एकास एक उमेदवारामुळे आता ही निवडणूक अटीतटीची झाली आहे. यावेळी पिचडांचा पराभव अटळ आहे. तालुक्याचा बारामती किंवा संगमनेरसारखा विकास व्हायला हवा होता, तो झाला नाही. विरोधक हे भाग्यविधाता नसून भकासविधाते आहेत. त्यांना राजूरमध्ये पिण्याचे पाणी देता आले नाही.