विद्यमान सरपंचांनाच निवडणूक होईपर्यंत पदावर ठेवा; सरपंच परिषदेची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2020 04:43 PM2020-06-06T16:43:53+5:302020-06-06T16:44:26+5:30
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विविध उपाययोजना राबविण्यासाठी सरपंच पदावर असणे आवश्यक आहे. त्यामुळे ग्रामपंचायतींवर प्रशासक न नेमता विद्यमान सरपंचांनाच निवडणूक निर्णय होईपर्यंत पदावर कायम ठेवण्यात यावे, अशी मागणी सरपंच परिषदेच्यावतीने मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे.
अहमदनगर : मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमण्याच्या हालचाली सरकारने सुरु केल्या आहेत. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विविध उपाययोजना राबविण्यासाठी सरपंच पदावर असणे आवश्यक आहे. त्यामुळे ग्रामपंचायतींवर प्रशासक न नेमता विद्यमान सरपंचांनाच निवडणूक निर्णय होईपर्यंत पदावर कायम ठेवण्यात यावे, अशी मागणी सरपंच परिषदेच्यावतीने मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे.
राज्यात पहिल्या टप्प्यातील १ हजार ५६६ ग्रामपंचायतीच्या निवडणुका मार्च ते जूनपर्यंत होणे अपेक्षित होते. पण कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे १ हजार ५६६ ग्रामपंचायतींची मुदत पूर्ण झाल्यानंतर या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्यासाठी राज्य सरकारने हालचाली चालू केल्या आहेत. पुढील टप्प्यातील १२ हजार ६६८ ग्रामपंचायतीच्या निवडणुकाही अनिश्चित काळासाठी पुढे ढकलत असल्याचे जाहीर केले आहे.
कोरोना निर्मुलनामध्ये ग्रामपंचायतींची भूमिका महत्त्वाची आहे. गावातील सरपंच, उपसरंपच, सदस्य गावात चांगले काम करीत आहेत. मात्र, आता राज्यातील १४ हजार २३४ ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमल्यास मोठ्या अडचणी निर्माण होणार आहेत. त्यामुळे मुदत पूर्ण झालेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासकाची नेमणूक न करता सरपंचांना निवडणूक निर्णय होईपर्यंत त्याच पदावर कायम ठेवावे, अशी मागणी सरपंच परिषदेचे राज्याध्यक्ष दत्ता काकडे, महिला राज्याध्यक्षा राणीताई पाटील, प्रदेश उपाध्यक्ष अनिल गिते, प्रदेश सरचिटणीस अॅड़ विकास जाधव आदींनी केली आहे.