केलवडला गढूळाचं पाणी
By Admin | Published: April 19, 2017 01:28 PM2017-04-19T13:28:49+5:302017-04-19T13:56:45+5:30
राहाता तालुक्यातील केलवड गावात गेल्या अनेक दिवसांपासून गढूळ पाण्याचा पुरवठा होत आहे़
आॅनलाइन लोकमत
अस्तगाव (अहमदनगर), दि.१९ - राहाता तालुक्यातील केलवड गावात गेल्या अनेक दिवसांपासून गढूळ पाण्याचा पुरवठा होत आहे़ नळाला येणारे पाणी लालसर व शैवालयुक्त असल्यामुळे त्याचा उग्र वास येत आहे़ त्यामुळे हे पाणी पिण्यासाठी योग्य नसल्यामुळे ग्रामस्थांकडून हे पाणी जनावरांना पाजण्यात येते़ मात्र, आता जनावरांनाही त्याचा त्रास सुरु झाला आहे़
जीवन प्राधिकरण योजनेअंतर्गत गावात पाणी पुरवठा केला जातो़ परंतू, हे पाणी न पिण्याचे आवाहन ग्रामपंचायतीने केले आहे़ त्यामुळे हे पाणी धुणी-भांडी तसेच जनावरांना पाजण्यासाठी वापरले जात आहे़ या पाण्याला उग्र वास येत असल्याने जनावरेही हे पाणी पिण्यास टाळाटाळ करीत असून, काही जनावरांना हे पाणी पिल्यामुळे पचननाचा त्रास सुरु झाला आहे़ त्यामुळे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनीही हे पाणी जनावरांना घातक असल्याचे सांगितले़
पिण्यासाठी सोडण्यात येणारे पाणी दूषित असल्यामुळे ऐन उन्हाळ्याच्या दिवसात पाण्यासाठी ग्रामस्थांना वणवण भटकंती करावी लागत आहे़ नळाला पिण्यायोग्य पाणी ग्रामपंचायतीकडून सोडले जात नाही़ गावातील पाण्याचे स्त्रोतही आटले आहेत. गावात एका सार्वजनिक बोअरला थोडे पाणी आहे़ मात्र, तेथे मोठी गर्दी होत असल्यामुळे नागरिकांना भर उन्हात पाण्यासाठी तिष्ठत उभे रहावे लागत आहे़ काही नागरिक रात्रीच्या वेळी पाणी वाहतात़ त्यामुळे गावाला टँकरद्वारे पाणी पुरवठा करावा, अशी मागणी होत आहे़
स्वच्छ पाण्यासाठी ‘लोकमत’चा पाठपुरावा
गावातील दूषित पाणी पुरवठ्याविषयी ‘लोकमत’ने सातत्याने वृत्त प्रकाशित स्वच्छ पाण्यासाठी पाठपुरावा केला आहे़ ‘लोकमत’ने यापूर्वी प्रकाशित केलेल्या वृत्ताची दखल घेऊन जिल्हा प्रशासन तसेच लोकप्रतिनीधींनी केलवडला भेटी दिल्या़ त्यानंतर काही दिवस गावाला स्वच्छ पाणी पुरवठा झाला़ परंतू पुन्हा काही दिवसांनी दूषित पाणी सोडले जाते. गेल्या काही दिवसांपासून पुन्हा नळाला दूषित पाणी येऊ लागले आहे़