राहुरीच्या तनपुरे कारखान्याने न्यायालयाच्या आदेशाला दाखवली केराची टोपली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2018 02:01 PM2018-05-12T14:01:42+5:302018-05-12T14:02:07+5:30
राहुरी येथील डॉ. बाबुराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्यातून २०११ मध्ये सात कर्मचारी सेवानिवृत्त झाले. या कर्मचा-यांना कारखाना प्रशासनाने निवृत्तीच्या वेळी विविध रकमा देणे गृहित होते. मात्र कारखाना प्रशासनाने रकमा दिल्या नाहीत.
अहमदनगर : राहुरी येथील डॉ. बाबुराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्यातून २०११ मध्ये सात कर्मचारी सेवानिवृत्त झाले. या कर्मचा-यांना कारखाना प्रशासनाने निवृत्तीच्या वेळी विविध रकमा देणे गृहित होते. मात्र कारखाना प्रशासनाने रकमा दिल्या नाहीत. त्यानंतर हे कर्मचारी कामगार न्यायालयात गेले. न्यायालयाने देय रकमा जमा करण्याचे आदेशही दिले. मात्र कारखाना प्रशासनाने न्यायालयाच्या निर्णयाला केराची टोपली दाखवत अद्यापपर्यत रकमा जमा केल्या नाहीत.
तनपुरे कारखान्यातून सावळेराम पांडुरंग भुजाडी, सोन्याबापू जनार्दन सागर, आसाराम नामदेव साळवे, सुर्यकांत बाबुराव कोरडे, बन्सी कोंडाजी गाडे, गोविंद पांडुरंग काळे, चांगदेव वाळुंज हे २०११ मध्ये सेवानिवृत्त झाले. या सातही कर्मचा-यांनी सेवानिवृत्तीच्या वेळी कोणत्याही प्रकारच्या देय रकमा कारखान्याकडून मिळाल्या नाहीत. यानंतर हे सातही कर्मचा-यांनी कामगार न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर कारखाना प्रशासनाने या कर्मचा-यांची पेन्शनही बंद केली. त्यानंतर २०१४ मध्ये न्यायालयाने कर्मचा-यांच्या बाजूने न्याय देत रकमा जमा करण्याचे आदेश दिले. याबाबत जिल्हाधिका-यांना न्यायालयाने आदेश दिले. न्यायालयाच्या निर्णयानुसार सर्वांना कमीत कमी अडीच लाख तर जास्तीत जास्त ९ लाख रुपये देण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. मात्र कारखान्याने अद्यापपर्यत रक्कम जमा केलेली नाही.
गेल्या पाच ते सहा वर्षांपासून पैसे मिळण्यासाठी लढत आहे. कारखाना प्रशासनाकडे वेळोवेळी मागणी केली मात्र पैसे देण्यास टाळाटाळ केली जात आहे. न्यायालयाच्या लढाईनंतरही यश आले नाही. आता थकल्यामुळे अडीअडचणीचा सामना करावा लागत आहे. आमच्यामधील एका जणाचा मृत्यूही झाला आहे. त्यामुळे आता आमरण उपोषणाला बसणार आहे. - सोन्याबापू सागर, मल्हारवाडी ता. राहुरी