उज्ज्वला गॅस योजनेमुळे शिधापत्रिकेवरील रॉकेलची नोंद गायब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:22 AM2021-08-29T04:22:07+5:302021-08-29T04:22:07+5:30
सद्यस्थितीत प्रगत तंत्रज्ञानामुळे घरोघरी विजेची सुविधा असल्याचे दिसत आहे. त्यामुळे घरातील रॉकेलवरील दिवे आता बंद झाले आहेत. शासनाने आता ...
सद्यस्थितीत प्रगत तंत्रज्ञानामुळे घरोघरी विजेची सुविधा असल्याचे दिसत आहे. त्यामुळे घरातील रॉकेलवरील दिवे आता बंद झाले आहेत. शासनाने आता ग्रामीण भागातील धुरयुक्त चुली बंद करण्यासाठी उज्ज्वला गॅस योजनेंतर्गत घरोघरी गॅस कनेक्शन उपलब्ध करून दिले आहे. गॅस असलेल्या व्यक्तीला रॉकेल देण्यात येऊ नये, या शासनाच्या नियमानुसार आता ग्रामीण भागात रॉकेलचा तुटवडा निर्माण झाला आहे. घरात विजेचे दिवे, गॅस कनेक्शन आले असले तरी अनेक कामांसाठी रॉकेलची आवश्यकता ही भासतेच. वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार, रॉकेलवर चालणारी पाण्याची इंजिन यासारख्या अनेक कारणासाठी रॉकेलची आवश्यकता भासतेच. सद्यस्थितीत जवळजवळ सर्वांचाच रॉकेल पुरवठा बंद झाल्याने रॉकेल मिळत नाही. मात्र रॉकेलचा पुरवठा बंद झाला असला तरी मागणी कायम असल्याने रॉकेलसाठी ग्रामीण भागात फार मोठा संघर्ष करावा लागत आहे. उन्हाळ्यात एखाद्या वेळी पाणी मिळेल पण रॉकेल नाही अशी स्थिती अनेक ठिकाणी निर्माण झाली आहे. त्यामुळे अनेकांना रॉकेलसाठी दाहीदिशांना भटकंती करण्याची वेळ आली आहे. शासनाने शिधापत्रिकेवरून रॉकेलचे वितरण कमी करत असताना रॉकेलची मागणी विचारात घेऊन खुल्या बाजारात रॉकेलची विक्री सुरू करावी, अशी मागणी ग्रामीण भागातून करण्यात येत आहे