कासारपिंपळगावमध्ये शिपायाची हत्या : गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2018 02:33 PM2018-08-02T14:33:39+5:302018-08-02T14:33:59+5:30
तालुक्यातील कासार पिंपळगाव येथील दादा पाटील राजळे महाविद्यालयाचे शिपाई बलभीम छबु कांबळे (वय ४५) यांची मंगळवारी रात्री तिसगाव ते शेवगाव रस्त्यावर हत्या करण्यात आली.
पाथर्डी : तालुक्यातील कासार पिंपळगाव येथील दादा पाटील राजळे महाविद्यालयाचे शिपाई बलभीम छबु कांबळे (वय ४५) यांची मंगळवारी रात्री तिसगाव ते शेवगाव रस्त्यावर हत्या करण्यात आली. हॉटेल सार्थकजवळीक जांभूळ ओढा येथे अज्ञात आरोपीने मानेवर वार करून ही हत्या केली.
याबाबत मयताचा भाऊ रामदास याने दिलेल्या फिर्यादीनुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीनुसार बलभीम कांबळे हे कुटुंबीयांसमवेत कासार पिंपळगाव येथे राहत असून दादापाटील राजळे महाविद्यालयात शिपाई म्हणून नोकरी करीत होते. मंगळवारी नेहमीप्रमाणे ते सकाळी ७ वाजता मोटारसायकलवरून महाविद्यालयात कामावर गेले. दिवसभर काम करून रात्री उशिरापर्यंत घरी न आल्याने पत्नी माया हिने मोबाईलवरून संपर्क साधला असता त्यांनी तिला घरी येत असल्याचे सांगितले. परंतु बुधवारी सकाळपर्यंत बलभीम घरी आले नाहीत. सकाळी तिसगाव ते शेवगाव रस्त्याने जाणारे अप्पासाहेब नाथा राजळे यांना हॉटेल सार्थक जवळील जांभूळ ओढा या ठिकाणी बलभीम कांबळे यांच्या मानेवर उजव्या बाजूस तसेच शरीरावर ठिकठिकाणी वार करून अज्ञात आरोपीने हत्याराने गंभीर जखमा केल्या त्यातच त्यांचा मृत्यू झाला. राजळे यांनी मयत बलभीम यांचे भाऊ रामदास यांना घटनेची माहिती दिली. त्यावरून रामदास यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदविला. पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर तपास करीत आहेत.