आर्थिक कारभाराच्या चाव्या नव्या कारभाऱ्याच्या हाती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2021 04:16 AM2021-01-01T04:16:00+5:302021-01-01T04:16:00+5:30

अहमदनगर : ग्रामपंचायतींपाठोपाठ जिल्ह्याच्या राजकरणातील महत्त्वाचे सत्ता केंद्र असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसह गावोगावच्या विकास सेवा सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा ...

The keys to financial management are in the hands of the new caretaker | आर्थिक कारभाराच्या चाव्या नव्या कारभाऱ्याच्या हाती

आर्थिक कारभाराच्या चाव्या नव्या कारभाऱ्याच्या हाती

अहमदनगर : ग्रामपंचायतींपाठोपाठ जिल्ह्याच्या राजकरणातील महत्त्वाचे सत्ता केंद्र असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसह गावोगावच्या विकास सेवा सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल नूतन वर्षात वाजणार आहे, तसेच जिल्ह्यातील दीड हजाराहून अधिक विकास सेवा सहकारी संस्थांची मुदत संपलेली आहे. या संस्थांच्या निवडणुकाही याच वर्षात पार पडतील. त्यामुळे नूतन वर्षात आर्थिक कारभाराच्या चाव्या नव्या कारभाऱ्याच्या हातात येणार आहेत.

जिल्ह्यात सध्या ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीची प्रक्रियाही सोमवारपासून सुरू होणार आहे. जिल्हा बँक निवडणूक साखर कारखानदारांसाठी महत्त्वाची असते. बँकेवर प्रत्येक तालुक्यातून एका संचालकाची निवडणूक केली जाते. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असल्याने तालुक्यातील राजकीय समीकरणेही बदलली आहेत. राज्यात एकत्र असलेले पक्ष तालुक्यात एकत्र येणार का, हे या निवडणुकीतून समोर येणार आहे. जिल्ह्यातील १ हजार ६८६ विकास सेवा सहकारी संस्थांची मुदत मागील वर्षी संपलेली आहे. कोरोनामुळे विकास सेवा सहकारी संस्था, सहकारी साखर कारखान्यांच्या निवडणुका झालेल्या नाहीत. या निवडणुका नूतन वर्षात जाहीर होतील, असे दिसते. कारण लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. त्यामुळे मुदत संपलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुकाही जाहीर होतील.

न्यायालयाच्या आदेशाने जिल्हा सहकारी बँकेसह, मुळा, ज्ञानेश्वर, वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्यांची निवडणूक प्रक्रिया सुरू होत आहे. यासाेबत जिल्ह्यातील १८ विकास सेवा सहकारी संस्थांच्या निवडणुकीचीही प्रक्रिया सुरू होणार असून, बँकेची ३ हजार ५१९ मतदारांची प्रारूप मतदार यादी यापूर्वीच प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. अंतिम मतदार यादी नाशिक येथील दुय्यम निबंधकांकडून प्रसिद्ध होईल. अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नेमणूक केली जाईल. मतदार यादीचा टप्पा पूर्ण झाल्यानंतर पुढचा टप्पा प्रत्यक्ष निवडणुकीचा असणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघणार असून, ग्रामीण भागातही विकास सेवा संस्थांच्या निवडणुकांचा धुराळा उडणार आहे. ग्रामपंचायतींपाठोपाठ जिल्हा बँक, विकास सेवा सहकारी संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू होणार असल्याने हे वर्षे निवडणुकांचे असणार आहे.

....

१ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२० मध्ये मुदत संपलेल्या संस्था

ब- ८८८, क-५५१, ड- २४६

...

१ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२१ मध्ये मुदत संपणाऱ्या संस्था

ब- ४९६, क-२७९, ड-४७७

...

एकूण सहकारी संस्था

५,६८७

....

Web Title: The keys to financial management are in the hands of the new caretaker

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.