मातब्बरांच्याच खिशातच राहिल्या नगर तालुक्यातील गावांच्या चाव्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:21 AM2021-02-10T04:21:24+5:302021-02-10T04:21:24+5:30

नगर तालुका विश्लेषण केडगाव : आदर्शगाव हिवरेबाजार, बुऱ्हाणनगर, नवनागपूरसह २१ गावांचे कारभारी मंगळवारी बिनविरोध निवडण्यात आले. चास, जेऊर, गुंडेगाव ...

The keys of villages in Nagar taluka remained in the pockets of the rich | मातब्बरांच्याच खिशातच राहिल्या नगर तालुक्यातील गावांच्या चाव्या

मातब्बरांच्याच खिशातच राहिल्या नगर तालुक्यातील गावांच्या चाव्या

नगर तालुका विश्लेषण

केडगाव : आदर्शगाव हिवरेबाजार, बुऱ्हाणनगर, नवनागपूरसह २१ गावांचे कारभारी मंगळवारी बिनविरोध निवडण्यात आले. चास, जेऊर, गुंडेगाव येथे राजकीय उलथापालथ झाल्याने बहुमत असूनही सत्ता गेल्या. तालुक्यातील बहुतांश मातब्बरांनी वर्षानुवर्षे असणारी गावाची सत्ता पुन्हा आपल्याच खिशात ठेवली आहे.

नगर तालुक्यातील ५९ गावांच्या सरपंच, उपसरपंचपदाच्या निवडी पार पडल्या. तालुक्यात माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी बुऱ्हाणनगरची सरपंचपदाची निवडणूक बिनविरोध करीत आपले ३० वर्षाचे वर्चस्व अबाधीत ठेवले. तर जिल्हा परिषद सदस्य प्रताप शेळके, माधवराव लामखडे, भाग्यश्री मोकाटे, संदेश कार्ले या कारभाऱ्यांना आपल्या गावची सत्ता राखण्यात यश आले. मात्र, माजी सभापती बाळासाहेब हराळ यांच्या हातातून यंदा गुंडेगावची २० वर्षाची सत्ता निसटली आहे. एका अपक्षाने विरोधी गटाला साथ दिल्याने बाळासाहेब हराळ गटाला सत्तेतून पायउतार व्हावे लागले. आदर्शगाव हिवरेबाजारचे सरपंचपद महिला राखीव झाल्याने येथे पद्मश्री पोपटराव पवार यांना उपसरपंचपदावर समाधान मानावे लागले. सरपंचपदी विमल ठाणगे यांची बिनविरोध निवड झाली. खारे कर्जुने येथे दिवंगत नेते दादा पाटील शेळके यांचे नातू अंकुश शेळके उपसरपंच झाले. इसळ्कमध्ये संजय गेरंगे यांनी सरपंचपद घरात राखण्यात यश मिळवले.

चिचोंडी पाटीलमध्ये भाजपचे तालुकाध्यक्ष मनोज कोकाटे यांची सरपंचपदी निवड झाली. निंबळकमध्ये पुन्हा लामखडे यांनी आपली जादू दाखवत वर्चस्व सिद्ध

केले. सरपंचपदी त्यांनी आपल्या सुनबाईनाच मान दिला.

बाजार समितीचे सभापती अभिलाष घिगे यांनी तांदळी व माजी सभापती हरिभाऊ कर्डिले यांनी वाकोडी बिनविरोध करत आपले वर्चस्व कायम राखले आहे. कामरगावमध्ये बाजार समितीचे संचालक रावसाहेब साठे यांची २० वर्षांची सत्ता जाऊन तेथे तुकाराम कातोरे यांना सरपंचपदाची लॉटरी लागली.

नवनागापूर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी पंचायत समितीचे माजी सदस्य डॉ. बबन डोंगरे यांची बिनविरोध निवड झाली. घोसपुरी येथे वेळेत माघारीची प्रक्रिया न झाल्याने तेथे निवडणूक घ्यावी लागली. दरेवाडी येथे भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड व माजी सरपंच अनिल करांडे यांनी आपले वर्चस्व कायम राखले. खडकीत माजी सरपंच प्रवीण कोठुळे यांनी आपली सत्ता राखली. मांडवे गावात सत्तांतर झाले. सुभाष निमसे यांनी पुन्हा सत्ता खेचून आणली. टाकळी काझी गावात शिवसेनेचा भगवा फडकला. जेऊर परिसरातील गावात झालेल्या सरपंच निवडीत माजी आमदार शिवाजी कर्डिले यांचे वर्चस्व दिसून आले. डोंगरगण, इमामपूरवगळता सर्वच गावात कर्डिले गटाने सरपंचपद काबीज केले आहे.

...

बहुमत असूनही जेऊर, चासमध्ये महाआघाडीचे पानिपत

जेऊरमध्ये महाविकास आघाडीच्या ९पैकी ८ सदस्यांनी भाजपला मदत केल्याने येथे महाविकास आघाडीचे पानिपत झाले. तर चासमध्ये महाविकास आघाडीच्या दोन सदस्यांनी ऐनवेळी भाजपशी हातमिळवणी केल्याने बहुमत मिळवूनही महाआघाडी पराभूत झाली.

....

उदरमलच्या भिंगारदिवेंना सरपंचपदाची लॉटरी

उदरमल ग्रामपंचायतीत ७पैकी ६ जागा जिंकूनही सत्ताधारी गटाला विरोधी बाकावर बसावे लागले आहे. आरक्षणाचा उमेदवार नसल्याने येथे एकमेव निवडून आलेले जोसेफ भिंगारदिवे यांना सरपंचपदाची लॉटरी लागली आहे.

....

रूईछत्तीशी, धनगरवाडीत सरपंचपद रिक्त

रूईछत्तीशी येथे अनुसूचित जाती महिला सरपंचपदाचे आरक्षण पडले. पण आरक्षणाचे कोणीच नसल्याने हे पद रिक्त राहिले. धनगरवाडीतही सरपंचपदाचे आरक्षण असणारा उमेदवार नसल्याने हे पद रिक्त राहिले आहे.

...

धनगरवाडीत चिठ्ठी टाकून उपसरपंच

नगर तालुक्यातील धनगरवाडी येथे अनुसूचित जमाती महिलेसाठी सरपंचपद आरक्षित झाले आहे. परंतु, ग्रामपंचायतीत या प्रवर्गाचा सदस्यच नसल्याने धनगरवाडीत सरपंचपद रिक्तच राहिले. दरम्यान, उपसरपंचपदासाठी मतदान झाले. उपसरपंचपदासाठी मनीषा गायके विरुद्ध अशोक विरकर अशी लढत झाली. या लढतीत दोघांनाही समान मते मिळाली. त्यामुळे उपसरपंचपदाची चिठ्ठी टाकून निवड करण्यात आली. चिठ्ठीत मनीषा गायके उपसरपंच झाल्या.

...

फोटो ०९रंजना साळवे

...

ओळी- गुणवडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी रंजना शाम साळवे यांची निवड होताच युवकांनी जल्लोष केला.

Web Title: The keys of villages in Nagar taluka remained in the pockets of the rich

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.