खडामकर, तरटे यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 04:55 AM2021-02-20T04:55:52+5:302021-02-20T04:55:52+5:30
अहमदनगर : एकाच दिवशी दोन नाट्यकर्मींच्या निधनाने नगरच्या नाट्य-चित्रपट-सांस्कृतिक क्षेत्र हळहळले. येथील नाट्यकर्मी अजय खडामकर आणि सुनील तरटे यांचे ...
अहमदनगर : एकाच दिवशी दोन नाट्यकर्मींच्या निधनाने नगरच्या नाट्य-चित्रपट-सांस्कृतिक क्षेत्र हळहळले. येथील नाट्यकर्मी अजय खडामकर आणि सुनील तरटे यांचे निधन झाले. दोघांवर शोकाकुल वातावरणात येथील अमरधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.
तोफखाना भागातील रहिवासी व सध्या बोरुडे मळा येथे राहत असलेले सुनील ज्ञानेश्वर तरटे (वय ४४) यांचे बुधवारी (दि. १७) पहाटे निधन झाले. तरटे हे नगरच्या हौशी रंगभूमीवर अभिनेता आणि तंत्रज्ञ म्हणून सप्तरंग नाट्य संस्थेच्या माध्यमातून गेली २० वर्षे काम करीत होते. अखिल भारतीय नाट्य परिषद या संस्थेचे ते क्रियाशील सभासद होते. काही लघुपट, मालिका आणि चित्रपटात त्यांनी भूमिका साकारल्या. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुली, आई, वडील, बहीण असा परिवार आहे.
अभिनेते अजय मधुकर खडामकर (वय ५२) यांचेही बुधवारी (दि. १७) निधन झाले. खडामकर हे नगरच्या नाट्यक्षेत्रात अभिनेता आणि उत्कृष्ट प्रकाश योजनाकार म्हणून २५ वर्षांपासून काम करीत होते. ‘लंडनची सून इंडियात हनिमून’ या व्यावसायिक नाटकाच्या ३०० पेक्षा जास्त प्रयोगात त्यांनी भूमिका साकारली. डी.वाय. पाटील विद्यापीठ येथे आर्टिस्ट म्हणून त्यांनी नोकरी केली. उत्तम चित्रकार म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या मागे पत्नी, मुलगी, आई असा परिवार आहे.
स्व. तरटे आणि स्व.खडामकर यांच्यावर बुधवारी दुपारी नगर येथील अमरधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध नाट्यसंस्थांच्यावतीने त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी चित्रपट निर्माते, अभिनेते बलभीम पठारे, संजय घुगे, अखिल भारतीय मराठी चित्रपट मंडळाचे जिल्हा समन्वयक शशिकांत नजान, नाट्य परिषदेचे अध्यक्ष अमोल खोले, सप्तरंग थिएटर्सचे अध्यक्ष श्याम शिंदे, ज्येष्ठ रंगकर्मी पी. डी. कुलकर्णी, रंगकर्मी प्रतिष्ठानचे अध्यक्ष रितेश साळुंके, अभिनेते क्षितिज झावरे, प्रसाद बेडेकर, वैभव कुऱ्हाडे, प्रशांत जठार, आबा सैंदाने आदींनी दिवंगत नाट्यकर्मींना श्रद्धांजली अर्पण केली.
---
फोटो- १८ सुनील तरटे
१८ अजय खडामकर