खांडगेदरा गावाला वनग्राम पुरस्कार प्रदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2018 09:50 PM2018-03-21T21:50:07+5:302018-03-21T21:50:18+5:30
राज्यस्तरीय समितीच्या पाहणीत १०० पैकी ९९ गुण मिळवत या गावाने राज्यात दुसरा क्रमांक पटकावत जिल्ह्याचे शिरपेचात मानाचा तुरा रोवला.
बोटा : शासनाच्या वनविभागाच्या संत तुकाराम वनग्राम योजनेअंतर्गत संयुक्त वनव्यवस्थापनाच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल संगमनेर तालुक्यातील खांडगेदरा या गावाला मिळालेला राज्यस्तरीय दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार जागतिक वन दिनी बुधवारी मुंबई येथे झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वनसमितीला प्रदान केला.
वनविभागाचे अखत्यारीतील जंगलाच्या संरक्षण अवैध चराई व अतिक्रमण रोखण्यात मिळालेले यश वन वणव्यांचे केलेले प्रतिबंधक उपाय, मृद जलसंधारण व वृक्षारोपण आदी कामे मार्गी लावण्यासाठी ग्रामस्थांसह महिला वर्गाचा सहभाग व इतर अठरा कसोट्यांचे घारगाव वन परिमंडळातील खांडगेदरा गावाच्या वनव्यवस्थापन समितीने केलेली काटेकोर अंमलबजावणी यामुळे राज्यस्तरीय समितीच्या पाहणीत १०० पैकी ९९ गुण मिळवत या गावाने राज्यात दुसरा क्रमांक पटकावत जिल्ह्याचे शिरपेचात मानाचा तुरा रोवला.
दरम्यान जागतिक वन दिनी बुधवारी मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर, मुख्य सचिव सुमित मल्लिक, वनविभागाचे सचिव विकास खारगे यांचे उपस्थितीत खांडगेदरा वनव्यवस्थापन समिती अध्यक्ष रवींद्र खांडगे, उपाध्यक्ष गणपत ढोकरे, सचिव व वनपाल बापूसाहेब काळे, संजय खांडगे यांनी पुरस्कार स्वीकारला. मानपत्र सन्मानचिन्ह, एक लाख सहासष्ठ हजार रूपयांचा धनादेश असे पुरस्काराचे स्वरूप आहे.