खांडगावचे खरबूज अरब राष्ट्रात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 04:19 AM2021-04-06T04:19:16+5:302021-04-06T04:19:16+5:30
श्रीगोंदा : श्रीगोंदा तालुक्यातील दुष्काळी भागातील खांडगाव म्हटले की ज्वारीचा ब्रॅण्ड सर्वांनाच आठवतो. परंतु येथील युवा शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा ...
श्रीगोंदा : श्रीगोंदा तालुक्यातील दुष्काळी भागातील खांडगाव म्हटले की ज्वारीचा ब्रॅण्ड सर्वांनाच आठवतो. परंतु येथील युवा शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत पीक पॅटर्न बदलला आहे. येथील गणेश पानसरे या शेतकऱ्याने पिकवलेल्या सोनेरी रंगाच्या खरबुजाने सर्वांनाच भुरळ पाडली आहे. या खरबुजांची थेट अरब राष्ट्रात निर्यात झाली आहे.
गणेश पानसरे यांना खरबूज पिकातून अडीच महिन्यात दीड एकरात सहा लाखांचे उत्पन्न मिळाले आहे.
खांडगावची ओळख ही ज्वारीचे कोठार म्हणून सर्वदूर आहे. पण कृषीमित्र राहुल पोळ, शैलेंद्र ढवळे यांनी गावातील युवा शेतकऱ्यांचा ग्रुप तयार करून कमी कालावधीत येणारे सेंद्रिय भाजीपाला, फळे व भात, खपली गहू सारख्या पिकांची गोडी या युवा शेतकऱ्यांना लावली. कृषी अधिकारी पद्मनाभ म्हस्के व कृषी सहायक ओंकार मुळे यांनी मार्गदर्शन व शासकीय योजनांचा लाभ देऊन या युवा शेतकऱ्यांच्या मागे शासनाचे पाठबळ उभे केले.
यावर्षी पाणी परिस्थितीचा अंदाज घेऊन संदीप टकले, महेश टकले, आदेश टकले, उत्तम गाडे, कैलास ढवळे, नानाभाऊ ढवळे, बाळू ढवळे, नाना कंद, अजिनाथ ढवळे यांनी दहा एकरात संकरित खरबुजाची शेती केली. रमजान महिन्यात खरबूज निघेल, असे नियोजन केले. त्यामुळे या पिकातून खांडगावमध्ये २५ ते ३० लाखांची उलाढाल अपेक्षित आहे. गणेश पानसरे या शेतकऱ्याने सोनेरी रंगाची आणि अविट गोडी असलेल्या खरबूज लागवडीचा प्रयोग केला आहे. या खरबुजाला परदेशात मोठी मागणी आहे. परंतु कोरोनामुळे परदेशात शेतीमाल पाठविण्यास अडचण होती. मात्र, मुंबईतील एका व्यापाऱ्याच्या मध्यस्थीने गणेश पानसरे यांचे खरबूज अरब राष्ट्रात निर्यात झाले आहे. दहा किलो वजनाच्या एका बाॅक्सला २०० ते २५० रुपयांचा भाव मिळला आहे. त्यामुळे दीड एकरात अवघ्या ७० दिवसांत सहा लाखांचे उत्पन्न मिळण्याची शक्यता पानसरे यांनी व्यक्त केली.
..............
कोहिनूर खरबूज हे आव्हानात्मक पीक आहे. पण आव्हान स्वीकारले आणि श्रीगोंद्याचे कृषी तज्ज्ञ राहुल पोळ, शैलेश ढवळे यांनी मार्गदर्शन केले. हे खरबूज यशस्वी झाले. पण कोरोनामुळे निर्यातीसाठी अडचण आली. तरीही परिस्थितीवर मात करीत हे खरबूज दुबईला निर्यात होणार आहे, याचा मनात आनंद आहे.
- गणेश पानसरे, खांडगाव
.........
दुष्काळी भागातील युवा शेतकऱ्यांनी अनेक अडचणींवर मात करून आधुनिक पध्दतीने शेती करण्याचा मार्ग स्वीकारला आहे. यामध्ये खांडगावमधील शेतकरी आघाडीवर आहेत. गणेश पानसरे यांचे खरबूज अरब राष्ट्रात निर्यात होत आहे, ही अभिमानाची बाब आहे.
- राहुल पोळ, कृषीतज्ज्ञ श्रीगोंदा