खर्डा किल्ला : मराठ्यांच्या विजयी शौर्यगाथा लढाईला २२३ वर्षे पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2018 01:06 PM2018-03-11T13:06:09+5:302018-03-11T13:06:39+5:30

इतिहास प्रसिद्ध खर्ड्याची लढाई ११ मार्च १७९५ रोजी सुरू झाली. मराठ्यांची अखेरची विजयी शौर्यगाथा म्हणून ओळखल्या जाणा-या या लढाईला इतिहासात महत्त्व आहे. २२३ वर्षांच्या विजयाची परंपरा असलेला ऐतिहासिक दुर्ग खर्डा नगरीत आजही प्रेरणा देत आहे.

Kharda fort: 223 years of fighting for the Marathas victory victory | खर्डा किल्ला : मराठ्यांच्या विजयी शौर्यगाथा लढाईला २२३ वर्षे पूर्ण

खर्डा किल्ला : मराठ्यांच्या विजयी शौर्यगाथा लढाईला २२३ वर्षे पूर्ण

संतोष थोरात
खर्डा : इतिहास प्रसिद्ध खर्ड्याची लढाई ११ मार्च १७९५ रोजी सुरू झाली. मराठ्यांची अखेरची विजयी शौर्यगाथा म्हणून ओळखल्या जाणा-या या लढाईला इतिहासात महत्त्व आहे. २२३ वर्षांच्या विजयाची परंपरा असलेला ऐतिहासिक दुर्ग खर्डा नगरीत आजही प्रेरणा देत आहे.
अनेक ऐतिहासिक पोवाडे व विस्तृत प्रमाणातील वाङ्मयातून खर्डा लढाईचे ऐतिहासिक महत्त्व विषद केले आहे. अनेक ऐतिहासिक पुस्तकांचे प्रसिद्ध लेखक व प्रसिद्ध इतिहास अभ्यासक गो. स. सरदेसाई यांच्या मराठी रियासत उत्तर विभाग-२ या पुस्तकात खर्डा येथील संग्रमाबद्दल लिहिताना ते म्हणतात, पानिपतच्या संहाराचा चटका महाराष्ट्राच्या अंत:करणात जितका ताजा आहे, तितकाच खर्ड्याचा विजय मराठ्यांच्या बाहुला आजही स्फुरण चढवितो. मराठ्यांचा या लढाईतील विजयानंतर अवघ्या सात महिन्यांतच होतकरू व या लढाईचे नेतृत्व करणारे सवाई माधवरावांचा हृदयद्रावक अंत होऊन मराठा साम्राज्याचा विनाशकाल सुरू झाल्याने तर खर्ड्याच्या विजयाला जास्तच महत्त्व प्राप्त झाले.
मराठा सत्तेचा प्रभाव दक्षिणेत वाढविण्याचे नाना फडणवीसांनी ठरवल्यानंतर पेशवा दौलतराव शिंदे, तुकोजी होळकर आणि दुसरा रघुजी भोसले यांच्या संयुक्त फौजांनी हैदराबादच्या निजामावर आक्रमक केले व हीच लढाई खर्डा येथे झाली. मराठ्यांशी उघड्या रामटेकडी मैदानावर तोंड देण्याचे सामर्थ्य निजामाकडे नसल्याने निजामाच्या फौजांनी खर्डा किल्लाचा आश्रय घेतला. १२ मार्चपासून २७ मार्चपर्यंत तहाच्या वाटाघाटी किल्ल्यात चालू होत्या. त्या अवधीत निजामाचे हाल चालले होते. शेवटी अन्न व पाण्यावाचून सैन्यांचे भयंकर हाल होत आहेत. हे पाहून २७ मार्चला निजामाच्या सरदार मुशीरुल्मुलक आपण होऊन मराठ्यांच्या स्वाधीन झाला. पुढे निजाम-मराठ्यांत तह होऊन त्यात नवे साडेचौतीस लक्षच मुलूख मराठ्यांना देण्यात आला. त्यामुळे दौलताबादचा किल्ला व त्या भोवतालचा प्रदेश पेशव्यांना, तर व-हाडचा प्रदेश महसुलासहीत नागपूरच्या भोसल्यांना देण्यात आला. पाच कोटी रुपये थकलेल्या चौथाई व युद्ध खंडणीपोटी देण्याचे मान्य केले.

खर्डा किल्ल्याचे रूप पालटणार

खर्डा येथील ऐतिहासिक संदर्भ असलेल्या वास्तूची आता पडझड झाली आहे. भुईकोट किल्ला निंबाळकर गढी व समाधी बारा प्रतिज्योतिर्लिंग मंदिरे आदींचा समावेश ‘क’ वर्ग पर्यटन व तीर्थक्षेत्र अशा दोन्ही आराखड्यांत करण्यात आला आहे. किल्ल्याची दुरुस्ती, मजबुतीकरण, सुशोभिकरण अंतर्गत बगीचा, ध्वनी प्रकाश, परिणामाद्वारे इतिहास कथन, वाहनतळ, स्वच्छतागृह आदी कामांसाठी आठ कोटींची तरतूद असून, याद्वारे खर्डा किल्ल्याचे रूप पालटणार आहे. मराठ्यांच्या गौरवशाली, संस्मरणीय, अभिमानास्पद विजयाचा साक्षीदार असलेल्या खर्डा येथील भुईकोट किल्ला व इतर ऐतिहासिक वास्तूंचा पर्यटनदृष्ट्या विकास झाल्यास खर्डा प्रेरणास्थान ठरेल. 

 

Web Title: Kharda fort: 223 years of fighting for the Marathas victory victory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.