पावसाने ओढ दिल्याने खरिपातील पिके धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:26 AM2021-08-25T04:26:16+5:302021-08-25T04:26:16+5:30
विठा घाटाच्या माथ्यावर चढून आले की, पावसाचा परिसर सुरू होतो. अगदी मृग नक्षत्राच्या सुरुवातीपासूनच पाऊस येथे हजेरी लावत असतो. ...
विठा घाटाच्या माथ्यावर चढून आले की, पावसाचा परिसर सुरू होतो. अगदी मृग नक्षत्राच्या सुरुवातीपासूनच पाऊस येथे हजेरी लावत असतो. या वर्षीही नेहमीप्रमाणे पावसाने या भागात हजेरी लावली. या पावसावर परिसरातील शेतकऱ्यांनी खरीप पिकांची पेरणी केली व भात लागवडीसाठी रोपेही टाकली. मात्र यानंतर काही दिवसांत पुन्हा पावसाने दांडी मारली. भात खाचरांत पाणी आलेले नसल्याने भात लागवडी खोळंबल्या होत्या. पंधरा दिवसांची ओढ दिल्यानंतर या परिसरात धो-धो पाऊस पडला. ओढे-नाले भरून वाहू लागले आणि भात खाचरेही तुडुंब भरली. येथील बळीराजा सुखावला आणि खोळंबलेल्या भात लागवडी पूर्ण झाल्या. असे असले तरी या परिसराला साजेसा पाऊस अद्यापही बरसला नाही. जमिनीची तहान पूर्णपणे भागली नसल्याने पावसाचे प्रमाण कमी होताच येथील ओढे-नाले क्षीण होऊ लागले. त्यातच मागील पाच-सहा दिवसांपासून पावसाने पूर्णपणे उघडीप दिल्याने आता भात खाचरांतील पाणी एकदमच कमी झाल्याने भात पिके अडचणीत आली आहेत. दुसरीकडे भरात असलेल्या उडीद आणि सोयाबीनला आता चांगल्या शेंगा लागल्या आहेत. मात्र पावसाने ओढ दिल्याने या शेंगा भरतात की नाही, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे पडला आहे.
..............
दिवसभर ऊन
मागील तीन दिवसांपासून आकाशातील ढगांची गर्दी कमी झाली असून, दिवसभर ऊन पडत आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचे डोळे आता आभाळाकडे लागले आहेत.
.........................
धरणातील आवक थांबली
नगर जिल्ह्याची चेरापुंजी समजल्या जाणाऱ्या घाटघर येथेही मागील दोन दिवसांपासून पावसाने पूर्णपणे विश्रांती घेतली असल्याने येथील धबधबे क्षीण होत आहेत. यामुळे भंडारदरा धरणात येणाऱ्या नवीन पाण्याची आवकही थांबली असल्याने धरणसाठा ‘जैसे थे’ आहे.