शेवगाव तालुक्यात यंदा खरिपाचे ६१ हजार हेक्टरवर नियोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:21 AM2021-05-06T04:21:55+5:302021-05-06T04:21:55+5:30

शेवगाव : तालुका कृषी विभागाने यंदाच्या खरीप हंगामासाठी ६१ हजार १५० हेक्टरवर नियोजन केले आहे. कापूस आणि तूर या ...

Kharif planning on 61 thousand hectares in Shevgaon taluka this year | शेवगाव तालुक्यात यंदा खरिपाचे ६१ हजार हेक्टरवर नियोजन

शेवगाव तालुक्यात यंदा खरिपाचे ६१ हजार हेक्टरवर नियोजन

शेवगाव : तालुका कृषी विभागाने यंदाच्या खरीप हंगामासाठी ६१ हजार १५० हेक्टरवर नियोजन केले आहे. कापूस आणि तूर या नगदी पिकांवर यंदा नियोजनात भर देण्यात आला आहे. मात्र, गतवर्षीचा अनुभव लक्षात घेता कपाशीचे क्षेत्र घटले असून, शेतकऱ्यांचा तुरीकडे अधिक कल वाढला आहे. प्रायोगिक तत्त्वावर पाच गावांत कपाशी लागवडीसाठी ‘एक गाव, एक वाण’ उपक्रम राबविला जाणार आहे.

तालुक्याचे भौगोलिक क्षेत्र ९८ हजार ५५१ हेक्टर असले तरी पीक लागवडीलायक ९४ हजार ११८ हेक्टर क्षेत्र आहे. त्यापैकी ५६ हजार २७२ हेक्टर क्षेत्र खरिपासाठी योग्य आहे. यंदा पडीक जमीन वगळता ६१ हजार १५० हेक्टर क्षेत्रावर कृषी विभागाने खरिपाचे नियोजन आखले आहे. तालुक्याचे पर्जन्यमान सरासरी ५६३ मि.मी. आहे. मागील वर्षी सरासरीपेक्षा दुपटीने चांगला पाऊस झाला आहे. यंदा पाऊस समाधानकारक राहणार असल्याचा वेधशाळेचा अंदाज आहे.

गेल्या काही वर्षांपासून कपाशीवर सातत्याने रोग पडत असल्याने उत्पादनात मोठी घट होऊन शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे कपाशी लागवड करणारा शेतकरी इतर पीक घेण्याकडे वळला आहे.

या पार्श्वभूमीवर तालुका कृषी विभागाकडून पहिल्यांदाच तालुक्यातील पाच गावे निवडून ‘एक गाव, एक वाण’ ही योजना प्रायोगिक तत्त्वावरील प्रयोग म्हणून राबवून कपाशी लागवडीचे नियोजन केले आहे. याचबरोबर उत्पादन वाढविण्यासाठी विविध उपाययोजना आखताना शेतीविषयक विविध मोहीम राबवली जाणार असल्याचे कृषी अधिकारी कानिफनाथ मरकड यांनी सांगितले. देवटाकळी, राक्षी, ठाकूर निमगाव, पिंगेवाडी, खडकी, सुलतानपूर खुर्द या गावांत कपाशीचा ‘एक गाव, एक वाण’ असा प्रयोग केला जाणार आहे.

----

खरिपाचे असे आहे नियोजन...

पीक क्षेत्र (हेक्टर)- बाजरी ६,५००, मका, ४००, तूर, ८,५००, मूग, ७००, उडीद ३००, भुईमूग ५००, तीळ ९०, कारळे ७०, सूर्यफूल १०, सोयाबीन २८०, कापूस ४२,७००, ऊस १७,५००.

----

रासायनिक खतांची मागणी (मे. टन)...

युरिया ७,०३०, डी.ए.पी. १,७९९, एम.ओ.पी. १,०७१, एस.एस.पी. १,५४८, मिश्र खते ५,३३०.

Web Title: Kharif planning on 61 thousand hectares in Shevgaon taluka this year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.