नगर तालुक्यात खरीप हंगाम धोक्यात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2018 06:06 PM2018-06-16T18:06:13+5:302018-06-16T18:06:58+5:30

मोठ्या कष्टाने मशागत करून खरिपाची तयारी करत असलेला नगर तालुक्यातील बळिराजा आता पाऊस लांबल्याने चिंतातूर झाला आहे.

Kharif season danger in Nagar taluka! | नगर तालुक्यात खरीप हंगाम धोक्यात !

नगर तालुक्यात खरीप हंगाम धोक्यात !

ठळक मुद्देपावसाची प्रतीक्षा : पाऊस लांबल्याने पेरण्या खोळंबल्या : शेतकऱ्यांची चिंता वाढली

केडगाव : मोठ्या कष्टाने मशागत करून खरिपाची तयारी करत असलेला नगर तालुक्यातील बळिराजा आता पाऊस लांबल्याने चिंतातूर झाला आहे. पावसाने ओढ दिल्याने तालुक्यात पेरण्या खोळंबल्या आहेत. महागडी बियाणे आणि खते खरेदी करूनही पावसाची प्रतीक्षा होत असल्याने तालुक्यातील सुमारे २१ हजार हेक्टर खरिपाचे नियोजन धोक्यात सापडले आहे.
रब्बीचा असणारा नगर तालुका गेल्या काही वर्षांपासून खरीप पिकांकडे वळला आहे. यामुळे तालुक्यातील खरिपाचे क्षेत्र वाढून २१ हजार हेक्टर इतके झाले आहे. पूर्वमोसमी पावसाने नगर तालुक्यात पेरणीयोग्य परिस्थिती तयार होत असते. यंदा मात्र मान्सूनपूर्व पाऊस न झाल्याने खरिपाच्या पेरण्या लांबल्या आहेत. इंधन खर्च वाढल्याने भुर्दंड सोसून शेतकºयांनी शेतीची मशागत केली. महागडी बियाणे व खते खरेदी केली. मात्र पावसाने ओढ दिल्याने पेरणीच्या तयारीत असलेला बळिराजा आता चिंताग्रस्त बनला आहे.
तालुक्यात झालेल्या थोड्याफार पावसावर जवळपास २० टक्के शेतकºयांनी पेरण्या करण्याची घाई केली. इतर शेतकरी मात्र समाधानकारक पावसाची व वापसा योग्य जमिनीची वाट पाहत असल्याने त्यांच्या पेरण्या आता लांबल्या आहेत. तालुक्यात बाजरी, मका यांबरोबरच तूर, मूग, भुईमूग, सूर्यफूल, सोयाबीन, कपासी आदी खरीप पिकांच्या लागवडी होत असतात. शेतकºयांनी पेरणीचे सर्व नियोजन केले असले तरी पाऊस नसल्याने शेतकरी सध्या पावसाची प्रतीक्षा करत आहे.

तालुक्यातील खरीपाचे नियोजन
एकूण खरीपाचे क्षेत्र २१ हजार ( आकडे हेक्टर मध्ये)
बाजरी-१० हजार ६०७, मका- १ हजार ४६१, तूर-१ हजार २२ ,मुग- ३ हजार ८१२, भुईमुग-८७, सुर्यफुल-२०, सोयाबीन-२ हजार ३९ कपासी ५२० .असे जवळपास २ हजार हेक्टर क्षेत्रावर पेंरणीचे नियोजन करण्यात आले आहे.

नगर तालुका कृषी विभागाने खरीपाचे नियोजन केले आहे.मात्र पाउस लांबल्याने पेरण्या लांबल्या आहेत..दि.२५ पर्यंत पाउस झाला नाहीतर खरिपाच्या नियोजनावर त्याचा परिणाम होऊ शकतो.खरीप पेरणीचे उद्धीष्ट कमी होऊ शकते.-
--बाळासाहेब नितनवरे, कृषी अधिकारी, नगर तालुका


इंधन खर्च वाढल्याने जादा खर्च करून आम्ही शेतीची मशागत केली. खते-बियाणे खरेदी केली.मात्र अजून पेरणी योग्य पाउस नसल्याने आमच्या पेरण्या लांबल्या आहेत.लवकर पाऊस झाला नाहीतर हा हंगाम वाया जाणार आहे.यामुळे आधीच आर्थिक संकटात असणारा शेतकरी अजून अडचणीत येईल.
-तुषार मेहेत्रे, शेतकरी

Web Title: Kharif season danger in Nagar taluka!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.