नेवाशाच्या पश्चिम पट्ट्यात खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:15 AM2021-06-17T04:15:17+5:302021-06-17T04:15:17+5:30
पाचेगाव : नेवासा तालुक्यातील पाचेगाव, बेलपिंपळगाव, गोणेगाव, इमामपूर, पुनतगाव, निंभारी या पश्चिम पट्ट्यातील गावांमध्ये समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे ...
पाचेगाव : नेवासा तालुक्यातील पाचेगाव, बेलपिंपळगाव, गोणेगाव, इमामपूर, पुनतगाव, निंभारी या पश्चिम पट्ट्यातील गावांमध्ये समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे या भागात कपाशी वगळता खरिपातील इतर पिकांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत.
१ जून ते १५ जूनअखेर पाचेगाव येथे ४२ मिलिमीटर, तर बेलपिंपळगाव येथे २४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. मात्र, हा पाऊस खरीप पिकांच्या पेरण्या करण्यास पुरेसा नसल्याने शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसले आहेत. पाचेगाव, बेलपिंपळगाव परिसरात पाच टक्के शेतकऱ्यांनी कमी ओलीवर सोयाबीन, तूर, बाजरी पिकाच्या पेरण्या केल्या आहेत. मात्र, पावसाने दडी मारल्याने पिकांना तुषार सिंचनाने पाणी देण्याची वेळ या शेतकऱ्यांवर आली आहे.
पुनतगाव, गोणेगाव, इमामपूर, निंभारी, आदी गावांत कपाशी लागवड पूर्ण झाल्या. मात्र, इतर पिकांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. या भागात पाणीपातळी चांगली असल्याने शेतकऱ्यांनी कपाशी पिकाच्या मोठ्या प्रमाणावर लागवडी केल्या आहेत.
गतवर्षी जून महिन्यात अनेक शेतकऱ्यांनी कमी ओलीवर पेरण्या केल्या होत्या. त्या पेरण्या वाया जाऊन दुबार पेरणी करण्याची वेळ आली होती. तो अनुभव पाहता शेतकऱ्यांनी यंदा पेरणीसाठी आखडता हात घेतला आहे. सोयाबीन बियाणांची टंचाई असल्याने धोका पत्करायला नको, अशीच काहीशी भूमिका उत्पादक शेतकऱ्यांनी घेतल्याचे दिसत आहे. मात्र, वेळेत पाऊस न झाल्यास शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर परिणाम होऊन तोटा सहन करावा लागण्याची शक्यता आहे.
------
खरिपाच्या लागवडी क्षेत्रात निम्म्याने घट...
गेल्या दोन वर्षांत पावसाळा हंगामाच्या अंतिम टप्प्यात मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे या पट्ट्यातील शेतकऱ्यांनी ऊस पिकाच्या लागवडीकडे मोठ्या प्रमाणात जोर दिला. त्यामुळे यंदा खरीप पिकांच्या लागवडी क्षेत्रात निम्म्याने घट होणार आहे. सोयाबीनचा पेराही यंदा निम्म्याने घटण्याची चिन्हे आहेत.
---
१६ पाचेगाव शेती
पाचेगाव (ता. नेवासा) येथे पावसाने दडी मारल्याने नुकत्याच उगवण झालेल्या तूर पिकाला तुषार सिंचनाने पाणी देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
(छायाचित्र : रमेश शिंदे)