सव्वातीन लाख बालकांचा ‘खाऊ’ बंद; संपावर ९ व्या दिवशीही तोडगा नाहीच

By चंद्रकांत शेळके | Published: February 28, 2023 05:51 PM2023-02-28T17:51:15+5:302023-02-28T17:52:07+5:30

अंगणवाडी सेविकांचा संप : नवव्या दिवशीही तोडगा नाही, मुंबईत उपोषण सुरू

'Khau' stop for half three lakh children; There is no solution even on the 9th day of the strike of anganwadi sevika | सव्वातीन लाख बालकांचा ‘खाऊ’ बंद; संपावर ९ व्या दिवशीही तोडगा नाहीच

सव्वातीन लाख बालकांचा ‘खाऊ’ बंद; संपावर ९ व्या दिवशीही तोडगा नाहीच

चंद्रकांत शेळके 

अहमदनगर : महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कृती समितीच्या वतीने अंगणवाडी सेविकांनी आपल्या विविध मागण्यांसाठी राज्यभरात २० फेब्रुवारीपासून बेमुदत संप पुकारला आहे. संपाच्या नवव्या दिवसापर्यंत यावर काहीही तोडगा निघाला नसल्याने संप सुरूच आहे. आता मंगळवारपासून मुंबईच्या आझाद मैदानावर अंगणवाडी सेविकांनी उपोषण सुरू केले आहे. दरम्यान, या संपात जिल्ह्यातील शंभर टक्के म्हणजे साडेनऊ हजार अंगणवाडी सेविका, मदतनीस सहभागी आहेत. परिणामी सर्वच अंगणवाड्या बंद असल्याने जिल्ह्यातील सव्वातीन लाख बालके पोषण आहारापासून वंचित आहेत.
वारंवार मागणी करूनही मानधनात वाढ नसणे, अंगणवाड्यांचे भाडे, आहाराच्या दरात वाढ नाही, सेवासमाप्ती लाभ, आजारपणाच्या रजा नाहीत, हक्काच्या उन्हाळी सुट्ट्या बंद, नवीन मोबाइलसाठी निधी नाही, सदोष ट्रॅकर ॲप अशा मागण्यांबाबत शासनाकडे वेळोवेळी मागण्या करूनही दखल न घेतल्याने राज्यातील सर्व अंगणवाडी सेविकांनी २० फेब्रुवारीपासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे.

अहमदनगर जिल्ह्यात एकूण ५ हजार ६३४ लहान-मोठ्या अंगणवाड्या आहेत. यात ४ हजार ५९५ अंगणवाडी सेविका, ८१६ मिनी सेविका, तर ४ हजार १४२ मदतनीस असे एकूण साडेनऊ हजार कर्मचारी कार्यरत आहेत. हे सर्वजण बेमुदत संपात सहभागी असल्याने अंगणवाड्यांना २१ फेब्रुवारीपासून कुलूप आहे. तालुका, जिल्हा, तसेच राज्य पातळीवर अंगणवाडी सेविकांकडून दररोज निदर्शने, मोर्चे सुरू आहेत. परंतु अद्याप शासनाने यावर तोडगा काढलेला नाही. संपाचा नववा दिवस असूनही अद्याप तोडगा न निघाल्याने राज्यातील अंगणवाडी सेविकांनी मंगळवारपासून मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण सुरू केले आहे. यापूर्वी २०१४ मध्ये ४५ दिवस व २०१७ मध्ये ४० दिवस अंगणवाडी सेविकांचे आंदोलन सुरू होते. त्यामुळे आता हा संप मिटणार की आणखी चिघळणार, याकडे प्रशासनासह पालकांचेही लक्ष लागले आहे.

बालकांच्या खिचडीचा प्रश्न

जिल्ह्यात एकूण ५ हजार ६३४ लहान-मोठ्या अंगणवाड्या आहेत. या अंगणवाड्यांमध्ये शून्य ते सहा वयोगटातील एकूण ३ लाख २३ हजार ५४२ बालके आहेत. संपामुळे अंगणवाड्या बंद असून या बालकांची खिचडी बंद झाली आहे.

Web Title: 'Khau' stop for half three lakh children; There is no solution even on the 9th day of the strike of anganwadi sevika

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.