‘खेलो इंडिया’त नगरी झेंडा : श्रीगोंद्याच्या भाग्यश्री फंडला सुवर्ण, कर्जतच्या सोनाली मंडलिकला कांस्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2018 09:49 PM2018-02-03T21:49:37+5:302018-02-03T21:52:47+5:30
दिल्ली येथे झालेल्या खेलो इंडिया राष्ट्रीय महिला कुस्ती स्पर्धेत ५२ किलो वजनगटात श्रीगोंदा येथील भाग्यश्री फंड हिने महाराष्ट्राला एकमेव सुवर्णपदक मिळवून दिले. कर्जतच्या सोनाली मंडलिक हिने ४६ किलो वजनगटात कांस्यपदक मिळविले.
अहमदनगर/श्रीगोंदा : दिल्ली येथे झालेल्या खेलो इंडिया राष्ट्रीय महिला कुस्ती स्पर्धेत ५२ किलो वजनगटात श्रीगोंदा येथील भाग्यश्री फंड हिने महाराष्ट्राला एकमेव सुवर्णपदक मिळवून दिले. हरियाणाच्या संगीताला भाग्यश्रीने चितपट करीत सुवर्णपदकावर नाव कोरले. तर कर्जतच्या सोनाली मंडलिक हिने ४६ किलो वजनगटात कांस्यपदक मिळविले.
खेलो इंडिया स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या महिला कुस्ती संघात टाकळी लोणार (ता. श्रीगोंदा) येथील भाग्यश्री फंड व कर्जतची सोनाली मंडलिक या दोघींची निवड झाली होती. भाग्यश्री फंड ही भोसरी फाटा (पुणे) येथील श्री सयाजीनाथ मोझे इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये, तर सोनाली मंडलिक ही कर्जत येथील अमरनाथ विद्यालयात शिक्षण घेत आहे. आंतरराष्ट्रीय कुस्ती पंच दिनेश गुंड यांच्या मार्गदर्शनाखाली किरण मोरे यांनी भाग्यश्रीला कुस्तीचे प्रशिक्षण दिले आहे. सोनाली मंडलिक हिला गणेश शेळके हे कुस्तीचे प्रशिक्षण देत आहेत. दोघीही यापूर्वी राष्ट्रीय शालेय कुस्ती स्पर्धेत खेळलेल्या असून, या स्पर्धेत दोघींनीही सुवर्णकामगिरी केली होती. खेलो इंडिया स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाचे कुस्ती प्रशिक्षक दत्ता माने व संदीप वांजळे यांच्या मार्गदर्शनाखाली सोनाली व भाग्यश्री यांनी सराव केला.
महिला कुस्तीत महाराष्ट्राकडून एकमेव सुवर्ण पटकावणा-या भाग्यश्री फंड हिने हरियाणाच्या संगीताला लपेट डावावर अवघ्या १ मिनीट २० सेकंदात अस्मान दाखविले. सुवर्णपदकाची मानकरी ठरलेल्या भाग्यश्रीला पाच लाखांचे पारितोषिक केंद्रीय क्रीडा मंत्रालयाच्या वतीने प्रदान करण्यात आले.
खेलो इंडियात अशा झाल्या लढती
महिला कुस्ती स्पर्धेत ५२ किलो वजनगटात भाग्यश्री फंडने पहिल्य फेरीत काजल जाधवचा पराभव केला. दुस-या फेरीत उत्तर प्रदेशच्या साधनाला लोळविले. तिस-या फेरीत दिल्लीच्या शिवानीला धूळ चारुन अंतिम फेरी गाठली. अंतिम फेरीत हरियाणाची आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू संगीता हिला अस्मान दाखवून भाग्यश्रीने सुवर्णपदकावर नाव कोरले. ४६ किलो वजनगटात कर्जतच्या सोनाली मंडलिक हिने पंजाबच्या गोरिया हिच्यावर ८ गुणांनी विजय मिळवून तिस-या फेरीत प्रवेश केला. तिस-या फेरीत हरियाणाच्या हन्या कुमारी हिने सोनालीवर विजय मिळविला. त्यामुळे सोनालीला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.
आई-वडिलांना आनंदाश्रू
भाग्यश्रीचे वडील पोलीस दलात नाशिक येथे कार्यरत आहेत. भाग्यश्रीची आई भाग्यश्री व धनश्रीसह आळंदीत राहत आहेत. भाग्यश्रीने सुवर्णपदक जिंकल्याचे टीव्हीवर पाहून आई-वडिलांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू तराळले. तर टाकळी लोणार गावात फटाके फोडून ग्रामस्थांनी जल्लोष केला.
आंतरराष्ट्रीय कुस्ती पंच दिनेश गुंड व किरण यांच्या मार्गदर्शनाखाली सराव केल्याने खेलो इंडियामध्ये महाराष्ट्राला पहिले सुवर्णपदक मिळवून देण्याचे स्वप्न साकार झाले आहे. मला २०२४ होणा-या आॅलिंपिक स्पर्धेचे मैदान गाजवायचे आहे. त्यासाठी खूप मेहनत घेणार आहे.
-भाग्यश्री फंड, सुवर्णपदक विजेती कुस्तीपटू
राष्ट्रीय शालेय कुस्ती स्पर्धेत सोनालीने सुवर्णपदक पटकावले होते़ त्यामुळे तिची खेलो इंडिया स्पर्धेसाठी निवड झाली़ खेलो इंडिया स्पर्धेत सुवर्णपदक मिळविण्याच्या तयारीने सोनाली मैदानात उतरली होती़ मात्र, तिला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले़
-कोंडिबा मंडलिक, सोनालीचे वडील