‘खो-खो’ खेळालाही ग्लॅमर येईल : हेमंत टाकळकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2018 06:19 PM2018-12-22T18:19:09+5:302018-12-22T18:19:28+5:30
कबड्डीनंतर आता खो-खो या खेळाचाही एशियन गेम्स्मध्ये समावेश झाल्यामुळे खो-खो खेळालाही ग्लॅमर येईल़
अहमदनगर : कबड्डीनंतर आता खो-खो या खेळाचाही एशियन गेम्स्मध्ये समावेश झाल्यामुळे खो-खो खेळालाही ग्लॅमर येईल़ सध्या खो-खो खेळासाठी प्रायोजक कमी असल्यामुळे या खेळाला अपेक्षित ग्लॅमर लाभले नाही़ पण पुढील काळात खो-खो लीग सुरु झाल्यास या खेळालाही चांगले दिवस येतील, असा विश्वास अर्जुन पुरस्कार विजेते खो-खोपटू व खेलो इंडियाच्या तांत्रिक समितीचे सदस्य हेमंत टाकळकर यांनी व्यक्त केला़
नगरमध्ये एका कार्यक्रमासाठी आले असता टाकळकर यांनी ‘लोकमत’ला भेट दिली़ यावेळी त्यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला़ मातीवरुन मॅटवर गेलेल्या खो-खोमधील बदलत्या तंत्रावरही टाकळकर यांनी बोट ठेवले़ ते म्हणाले, खो-खो हा अस्सल भारतीय खेळ आहे़ त्यासाठी मोठा फिटनेस लागतो़ खो-खो हा पाठलागाचा आणि कौशल्याचा खेळ आहे़ पण सध्या खो-खो केवळ पळण्याचा खेळ झाला आहे़ त्यात कौशल्य कमी होत आहे़ पण मातीतल्या खो-खोमध्ये अजूनही ते कौशल्य, थरार टिकून आहे़ मॅटवर इंन्जुरी वाढल्या आहेत़ आधुनिक शुज आले आहेत़ त्यामुळे खेळणे सोपे झाले आहे़ पण कृत्रिम आणि नैसर्गिक खेळ हा फरक यात राहणारच आहे़ मी पूर्वी सात-सात मिनिटे पळती काढायचो़ तशी क्षमता आजच्या खेळाडूंमध्ये दिसत नाही़ आजचा खेळ खूप वेगवान झालाय़ पण कौशल्य हरवले आहे़ खेळाडूंनी कौशल्य आत्मसात करायला हवे़ इतर देशातील खो-खो खेळाडूंनी चांगले कौशल्य आत्मसात केले आहे, असे टाकळकर यांनी सांगितले़ यावेळी शिवछत्रपती पुरस्कार विजेते निर्मलचंद्र थोरात उपस्थित होते़
‘खो-खो’मध्ये ग्रामीण मुलांचे वर्चस्व
खो-खो ग्रामीण भागातील खेळाडूंचा सहभाग मोठा असतो़ त्यांच्यामध्ये चपळाई असते़ विविध स्पर्धांमध्ये ग्रामीण भागातील संघच विजयी झालेले दिसतात़ त्यातुलनेत शहरी खेळाडू कमी पडतात़
खेलो इंडियामुळे खेळाडूंना संधी
खेलो इंडियामुळे खेळाडूंना चांगली संधी निर्माण झाली आहे़ खेलो इंडियाचे सामने टी़व्ही़वर लाईव्ह दाखवले जातात़ त्यामुळे खेळाला ग्लॅमर प्राप्त होत आहे़ मागील खेलो इंडिया स्पर्धेत खो-खोचे उपांत्य आणि अंतिम सामने टीव्हीवर दाखविले होते़ त्यामुळे खेळाडूंचीही ओळख तयार होत आहे़ पुढील वर्षी ८ ते २० जानेवारी रोजी बालेवाडी (पुणे) येथे खेलो इंडियाच्या स्पर्धा होत आहेत़ या स्पर्धा नवीन खेळाडू घडविण्यात मोलाचे योगदान देतील़