अपहरण झालेली मुले पुण्यात सापडली
By Admin | Published: March 13, 2016 11:40 PM2016-03-13T23:40:50+5:302016-03-13T23:58:17+5:30
अहमदनगर : खासगी क्लासला न जाता तिन्ही मुले रेल्वेतून दौंडला आणि तेथून पुण्यात गेली. पुण्याजवळील केतकावळे येथे प्रतिबालाजीचे दर्शन घेवून पुन्हा पुण्यात परतली.
अहमदनगर : खासगी क्लासला न जाता तिन्ही मुले रेल्वेतून दौंडला आणि तेथून पुण्यात गेली. पुण्याजवळील केतकावळे येथे प्रतिबालाजीचे दर्शन घेवून पुन्हा पुण्यात परतली. तेथून त्यांनी हैदराबादला जाण्याची योजना आखली. मात्र मुलांचा शोध करणाऱ्या नातेवाईकांनी तीन मुलांना रेल्वे स्टेशनवर पाहिले आणि नगरला कळविले. नगरच्या पोलिसांनी पुण्याच्या पोलिसांमार्फत त्यांना ताब्यात घेतले आणि दुपारी नगरला आणले. कायदेशीर प्रक्रिया पार पाडल्यानंतर तिन्ही मुलांना त्यांच्या पालकांकडे सोपविले. मुलांच्या अपहरणनाट्याने मात्र पोलीस अधिकारी चांगलेच घामाघूम झाले होते.
एका खासगी क्लासला जाणारी तीन शाळकरी मुले शुक्रवारी दुपारी एक वाजता नगर शहरातील महाजन गल्लीतून गायब झाली होती. तेजस संभाजी निमसे (वय १४, रा. मांडवे, ता. नगर), अभिषेक चंद्रकांत म्याना (वय १४, रा. भराडगल्ली, तोफखाना) आणि विशाल रवींद्र जाधव (वय १४, रा. पानसरे गल्ली, अर्बन बँक चौक) अशी त्या मुलांची नावे आहेत. मुलांच्या पालकांनी कोतवाली पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दिली होती. १४ वर्षे वयाची मुले असल्याने पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला. कोतवाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक सोमनाथ मालकर, सहायक पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण, संदीप पाटील यांनी अथक परिश्रम करून रविवारी सकाळपर्यंत मुलाचा शोध लावला.
तिन्ही मुलांनी पुण्याचे तिकीट काढल्याची माहिती पोलिसांना नगरच्या रेल्वे स्थानकावरच मिळाली होती. त्यामुळे पोलिसांनी दौंड आणि पुणे रेल्वे स्थानकावर मुलांचा कसून शोध घेतला. नगर रेल्वे स्थानकावर विशाल जाधवचा नातेवाईक असलेल्या एका पोस्टमास्तरने मुले रेल्वेस्थानकात आल्याचे पाहिले होते. मात्र ती कोणत्या रेल्वेत बसली, याबाबत त्यांना माहिती नव्हती. सहायक पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी पुणे पोलिसांशी संपर्क साधून रेल्वे स्थानकावर शोध सुरू ठेवला. मुलांची छायाचित्रे व्हॉटस् अॅपवरून प्रसारित केली. दौंड जंक्शन, पुणे रेल्वे स्थानकावर सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आली. मात्र तिथे शोध लागला नाही. दरम्यान, शोध घेणाऱ्या मुलांच्या नातेवाईकांना तिन्ही मुले रविवारी सकाळी पुणे रेल्वेस्थानकावर आढळून आली. तसेच विशाल जाधव याने त्याच्या मामाला मोबाईलद्वारे पुण्याच्या रेल्वेस्थानकावर आल्याची माहिती दिली. त्यानंतर नगरचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी मुलांना पुण्यातून ताब्यात घेतले. ही मुले दुपारी नगरला आणल्यानंतर त्यांना रात्री पालकांच्या ताब्यात देण्यात आले. (प्रतिनिधी)
हैदराबादला जाण्याचा बेत
तिघांपैकी तेजस निमसे याच्याकडे तीन हजार रुपये होते. तोच मास्टरमार्इंड होता. त्यानेच पुण्याला जाण्याची योजना आखली. घरच्यांना सांगून पुण्याला जायचे ठरविले असते तर घरचे रागावले असते, यामुळे त्यांनी घरी न सांगता शुक्रवारी दुपारीच पुण्याला जायचा बेत आखला. गोवा-निजामाबाद एक्सप्रेसने आधी दौंड, नंतर पुणे, तेथून केतकावळे येथे जावून बालाजीचे दर्शन घेतले. शनिवारची रात्र रेल्वेस्टेशनवरच काढली. रविवारी सकाळी हैदराबादला जाण्याचा त्यांचा बेत होता. मात्र नातेवाईकांनी पाहिल्याने त्यांचा बेत हुकला. ‘पैसे संपल्याने आम्ही नगरकडेच निघालो होतो. रविवारी येणार होतो. पुणे येथे जावून परत यायचे होते. त्यामुळे घरच्यांना सांगितले नाही’, असे तिन्ही मुलांनी पोलिसांना सांगितले. दरम्यान, तिघांपैकी एकाने यापूर्वी दोनवेळा घरी न सांगता गायब होण्याचा पराक्रम केला होता, असे त्याच्या नातेवाईकांनी सांगितले. तिन्ही मुले नगरमधील एका नामांकित शाळेत नववीच्या वर्गात शिकत असून महाजन गल्लीतील खासगी क्लासमुळे त्यांच्यात घनिष्ठ मैत्री आहे.